चीनमधील करोनाचे केंद्र असलेल्या वुहान शहरात सोमवारी केवळ एक नवीन रुग्ण आढळून आला आहे. त्याचबरोबर देशात एकूण १३ बळी गेले असून मृतांची संख्या आता ३२२६ झाली आहे. हुबेई प्रांत व त्याची राजधानी असलेले वुहान शहर यांची लोकसंख्या एकूण ५ कोटी असून हा सर्व भाग २३ जानेवारीपासून बंद करण्यात आला होता. दरम्यान करोनाची साथ ओसरल्यानंतर आता डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी माघारी जाण्यास सुरुवात झाली आहे. चीनमधील वुहान शहरात सोमवारी एक रुग्ण सापडला असून १२ बळी गेले आहेत. हुबेई प्रांतात निश्चित रुग्णांची संख्या ६७,७९९ झाली आहे. ८००४ जण रुग्णालयात असून त्यांच्यापैकी २२४३ जणांची प्रकृती गंभीर आहे.  ५३९ जणांची स्थिती गंभीर आहे. करोनाची साथ संपली असली तरी त्यावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यास अजून एक महिना वाट पाहावी लागेल, असे मत आरोग्य आयोगाने व्यक्त केले आहे. सोमवारी हुबेई प्रांतात १२, तर शांक्सी प्रांतात एक बळी गेला आहे. दरम्यान ४५ संशयित रुग्ण सापडले असून  निश्चित रुग्णांची संख्या ८०,८८१ आहे. त्यात ३२२६ मृतांचा समावेश आहे. त्यापैकी ८९७६ जणांवर उपचार सुरू असून ६८,६७९ लोकांना उपचारानंतर घरी पाठवले आहे. अजून १२८ संशयित रुग्ण आहेत. सोमवारी परदेशातून आलेल्या रुग्णांची संख्या २० झाली असून  एकूण संख्या १४३ आहे. बीजिंगमध्ये त्यातील ९ रुग्ण आहेत. चीनने ३० हजार डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचारी हुबेई व वुहानमध्ये तैनात केले होते. त्यात लष्कराचे डॉक्टर्स व कर्मचारी यांचा समावेश होता. तेथे १४ रुग्णालये उभारण्यात आली होती. आता डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचारी काढून घेण्यास सुरुवात केली आहे. पेकिंग युनियन मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या संसर्गजन्य रोग विभागाच्या प्रमुख काव वे यांनी सांगितले की, विषाणूचा आम्ही तीन महिन्यात पराभव केला आहे, पण अंतिम शिक्कामोर्तब महिनाभराने करावे लागेल. आतापर्यंत जी माहिती आमच्याकडे आहे त्यानुसार हवामान व करोना विषाणू यांचा काही संबंध नाही. उन्हाळ्याने हा विषाणू मरतो याचे कुठलेही पुरावे नाहीत.

जर्मन, पोलंडच्या सीमा बंद

जर्मनीत लाखो लोक घरातच थांबले असून सीमा बंद करण्यात आल्या आहेत. युरोप ते अमेरिकेपर्यंत सर्व लोक र्निबधांना तोंड देत असून सामाजिक अंतर राखण्यासाठी सरकारी आदेशानुसार घरातच थांबले आहेत. मलेशियात वस्तू खरेदी करण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या आहेत. फिलिपीन्समध्ये नाक्यानाक्यावर तापाची नोंद घेतली जात असून त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. स्पेनमध्ये मंगळवारी एकाच दिवसात २००० जणांना संसर्ग होऊन एकूण रुग्ण १११७८ झाले आहेत. तेथील मृतांची संख्या २०० वरून ४९१ झाली आहे. इराणमध्ये ८५३ लोक मरण पावले असून १५ हजार जणांना बाधा झाली आहे. जगभरातील हवाई कंपन्यांनी उड्डाणे रद्द केली आहेत. जर्मनीने पर्यटकांना परत आणण्यासाठी ५० दशलक्ष युरोची तरतूद केली आहे. पोलंडने सीमा बंद केली असून लिथुआनियातून येणाऱ्या ट्रकची साठ किलोमीटरची रांग लागली आहे. इटलीत २१५८ जणांचा मृत्यू, तर  २७९८० जणांना संसर्ग झाला आहे.