मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्या नडेला यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत (सीएए) केलेल्या वक्तव्यावर भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी जोरदार टीका केली आहे. नडेला यांचे वक्तव्य हे साक्षरांना सुशिक्षित करण्याची कशी गरज आहे त्याचे योग्य उदाहरण आहे, असे लेखी यांनी म्हटले आहे. यासंदर्भात लेखी यांनी ट्विटवरुन आपले मत नोंदवले आहे.

नडेला काय म्हणाले?

“भारतामध्ये सध्या जे काही चालले आहे ते दु:खद आहे. भारतामध्ये येणाऱ्या बांगलादेशी शरणार्थीपैकी एखादा भारतातील बहुराष्ट्रीय कंपनीचे नेतृत्व करीत आहे हे पाहावयास आपल्याला आवडेल. कोणत्याही देशाने आपल्या सुरक्षेबाबत चिंता करू नये, असे आपले म्हणणे नाही, देशांमध्ये सीमा असतात आणि ही वस्तुस्थिती आहे,” असं नडेला म्हणाले.

शरणार्थी कोण?

स्थलांतर हा अमेरिकेचा प्रश्न आहे, युरोप आणि भारताचा मुद्दा आहे, मात्र स्थलांतर म्हणजे काय, शरणार्थी कोण आणि अल्पसंख्याक समूहा कोण हे तुम्ही कोणत्या आणि कशाच्या आधारावर ठरविता ते महत्त्वाचे आहे, असेही नडेला म्हणाले. या वेळी नडेला यांनी भारतामधील सर्वसमावेशक संस्कृतीचाही उल्लेख केला, आम्ही नाताळ आणि दिवाळी साजरी करतो, असेही ते म्हणाले.

लेखी यांचा टोला

साक्षरांना सुशिक्षित करण्याची गरज असल्याचा टोला लेखी यांनी लगावला आहे. “साक्षरांना सुशिक्षित करण्याची गरज का आहे याचे हे उत्तम उदाहरण आहे. (नडेला यांनी सांगितलेल्या) याच कारणामुळे बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये छळ झालेल्या अल्पसंख्याकांना सुधारित नागरिकत्व कायद्याअंतर्गत संधी देण्यात येणार आहे,” असं लेखी आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या. ट्विटच्या शेवटी त्यांनी नडेला यांना एक खोचक प्रश्न विचारताना लेखी यांनी, “अमेरिकेमध्ये यजीदी मुस्लीमांऐवजी सिरियन मुस्लीमांना संधी देण्यात याव्यात याबद्दल त्यांचे (नडेला यांचे) काय मत आहे?” असा सवाल उपस्थित केला.

नडेला यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरुन मंगळवारी दिवसभर सोशल नेटवर्किंगवर जोरदार चर्चा सुरु होती.