राज्यात गोमांसविक्रीवर बंदी घालण्याच्या जम्मू व काश्मीर उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध निदर्शने करणारे लोक आणि पोलीस यांच्यात शुक्रवारी येथे चकमकी झडल्या. या वेळी काही युवकांनी पाकिस्तानी व ‘इसिस’चे झेंडे फडकवले.

शुक्रवारचा नमाज संपल्यानंतर तोंडाला फडके गुंडाळलेल्या युवकांच्या एका गटाने तिरंगा ध्वज जाळला, तसेच नौहाटा भागातील ऐतिहासिक जामा मशिदीजवळ इसिस व अल-जिहाद दहशतवादी संघटनेसह इतर वादग्रस्त झेंडे आणि पाकिस्तानी झेंडय़ासारखे दिसणारे बॅनर्स फडकावले. या युवकांजवळ लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक हाफीज सईद आणि हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हान मुझफ्फर यांचे पोस्टर्सही होते.
काही निदर्शकांनी या भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांवर दगडफेक केली असता त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांडय़ा फोडल्या, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या चकमकींमध्ये कुणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. या चकमकी उशिरापर्यंत सुरू होत्या.
दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या निषेधार्थ दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्य़ात अनेक गोवंशीय प्राण्यांची कथितरीत्या कत्तल करण्यात आली.