जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हय्या कुमार याच्या अटकेवरून सरकार विरुद्ध संघटनेतील विद्यार्थी व डावे पक्ष यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाच्या परिसरात सोमवारी याच मुद्द्यावरून भाजप आमदार ओमप्रकाश शर्मा यांनी भाकपच्या एका कार्यकर्त्यांला धक्काबुक्की केल्यामुळे हा वाद आणखीनच चिघळला आहे. याप्रकरणी शर्मांना जाब विचारला असता, त्यावेळी माझ्याकडे बंदूक असती तर मी गोळीही मारली असती, असे उत्तर त्यांनी दिले. कोणी तुमच्या आईला शिव्या देत असेल तर तुम्ही त्याला मारणार नाही का, असा सवालही त्यांनी विचारला. मी न्यायालयाच्या परिसरात असताना एक व्यक्ती पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देत होता. मी त्याला जाब विचारायला गेलो असताना त्याने माझ्या डोक्यात मारले. मग, मी त्याला प्रतिकार करायला नको होता का?, असे त्यांनी विचारले. मी त्याच्यावर प्रतिकारासाठी केलेला हल्ला नैसर्गिक प्रतिक्रिया होती, असेही ओम प्रकाश शर्मांनी म्हटले. शर्मा सोमवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दाखल केलेल्या एका बदनामीच्या खटल्यासंदर्भात पटियाला हाऊस न्यायालयात आले होते.
याशिवाय, कन्हय्या कुमार याच्यावरील देशद्रोहाच्या प्रकरणाची सुनावणी होणार असलेल्या दिल्लीतील न्यायालयाबाहेर वकिलांनी विद्यार्थी व प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींपैकी काही जणांना धक्काबुक्की केली. दरम्यान, कुमारला आणखी दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कुमारच्या अटकेविरोधात जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी सोमवारपासून संप पुकारला आहे.