कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेच्या दोऱ्या राज्यपाल वजूभाई वाला यांच्या हाती असून हे वजूभाई वाला नेमके कोण आहेत, त्यांची राजकीय कारकिर्द आणि मोदींसाठी त्यांनी केलेला त्याग याचा घेतलेला हा आढावा….

वाला यांनी राजकारणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून पाऊल ठेवले. १९७१ च्या सुमारास गुजरातमध्ये जनसंघाची पाळेमुळे रुजवण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. आणीबाणीच्या काळात त्यांना ११ महिने तुरुंगात काढावी लागली होती. गुजरातमध्ये भाजपाची सत्ता  कुठेही नसताना त्यांनी राजकोट महापालिकेत भाजपाची सत्ता आणली आणि ते राजकोटमध्ये भाजपाचे पहिले महापौर ठरले. जवळपास २० वर्षे ते गुजरातमध्ये मंत्री होते. ते दोन वेळा गुजरातमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्षही होते.

मोदींसाठी सोडलेली आमदारकी
वजूभाई वाला हे गुजरातमधील भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. राजकोटमधून ते विधानसभेत निवडून आले होते. जानेवारी २००२ मध्ये मोदींना पहिल्यांदा गुजरातमध्ये निवडणूक लढवावी लागली होती. त्यावेळी वाला हे केशूभाई पटेल यांच्या मंत्रिमंडळात होते. वजूभाई वाला यांनी मोदींसाठी आमदारकी सोडली आणि पटेलांचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघात मोदींना भरघोस मताधिक्याने निवडून आणले. यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोदींनी मणीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि वाला यांना त्यांचा मतदारसंघ परत मिळाला.

मोदींचे विश्वासू सहकारी
वजूभाई वाला हे गुजरातमधील राजकारणात बरेच वर्ष सक्रीय होते. नरेंद्र मोदींच्या विश्वासू सहकाऱ्यांमध्ये वजूभाई वाला यांचा समावेश होता. त्यामुळे वाला यांच्याकडे गुजरातमध्ये अर्थ, महसूल, नगरविकास, उर्जा अशा विविध खात्यांची धूरा सोपवण्यात आली. २०१२ मध्ये ते गुजरातचे विधानसभा अध्यक्ष झाले.

कठीण परिस्थिती हाताळण्याची शैली
गुजरात विधानसभेत एखाद्या मुद्द्यावरुन चर्चा तापल्यावर वाजूभाई वाला हे त्यांच्या हलक्याफुलक्या टीपणीने तणाव कमी करायचे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार २००२ मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस- भाजपामधील संघर्ष शिगेला पोहोचला होता. वाजूभाई हे राजकोट- २ या मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. एका कार्यकर्त्याने त्यांच्याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात तक्रार केली. काँग्रेस कार्यकर्ते आम्हाला खूप शिव्या देतात, असे त्याने वाला यांना सांगितले. यावर वाला म्हणाले, ते काही देतायेत. तुमच्याकडून काही घेत नाही हे महत्त्वाचे. हे सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला होता.

कर्नाटकचे राज्यपाल
वाजूभाई पटेल यांची २०१४ मध्ये कर्नाटकच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. सिद्धरामैया सरकारसोबत त्यांचे संबंध चांगले होते. मात्र, काही विधेयकांमध्ये त्रुटींवर बोट ठेवले आणि ते विधेयक परत पाठवले.