नरेंद्र मोदी हे गरिबांसाठी भगवंताचा अवतार आहेत, कार्ल मार्क्‍सने बरीच पुस्तके लिहिली, पण ‘जनधन’सारख्या योजनेद्वारे मोदींनी मार्क्‍सपेक्षाही पुढचे पाऊल टाकले आहे, अशी स्तुतीसुमने एकेकाळचे निष्ठावंत काँग्रेसजन आणि इंदिरा गांधी यांचे निकटवर्ती लोकेश चंद्र यांनी उधळली आहेत. ८७ वर्षांचे लोकेश चंद्र यांची परराष्ट्र मंत्रालयाच्या अखतारितील ‘भारतीय सांस्कृतिक संबंध मंडळा’च्या अध्यक्षपदी पुढील तीन वर्षांसाठी निवड झाली आहे, याची या स्तुतीगानाला किनार आहे.
अर्थात लोकेश चंद्र यांचे कर्तृत्व असामान्यच आहे. १६ भाषांवर प्रभुत्व असलेले आणि ५९६ पुस्तके नावावर असलेले चंद्र यांना २००६मध्ये केंद्र सरकारने पद्मविभूषण किताबाने गौरविले आहे. सोविएत युनियनच्या विघटनाआधी तेथील बडय़ा नेत्यांशीही लोकेश चंद्र यांचे अगदी निकटचे संबंध होते. इंदिराजी आणि काँग्रेसशी अनेक दशके एकनिष्ठ राहिलेले चंद्र यांची मोदी सरकारने इतक्या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती कशी केली, याचे आश्चर्य अनेकांना वाटते. चंद्र यांच्याकडून सुरू असलेल्या मोदीस्तुतीने मात्र ते विरते.
आपण पक्के काँग्रेसनिष्ठ असूनही भाजपच्या बाजूला कसे झुकलात, या प्रश्नावर पांढराशुभ्र खादी कुर्ता आणि धोतर नेसलेले चंद्र म्हणाले की, मोदींसाठी राजकारण हे केवळ निवडणुकांपुरतेच असते. त्या झाल्या की ते केवळ देशहिताचाच विचार करतात. ते अगदी खुल्या मनाचे आहेत. डूख धरून कोणाशीही ते वागत नाहीत. देशाचे प्रश्न त्यांना अधिक महत्त्वाचे वाटतात. गरिबांसाठी तर ते देवाचे अवतार आहेत. मार्क्‍सने इतकी पुस्तके लिहिली, पण प्रत्यक्ष काम काय केले? मोदींनी जनधन योजनांसारखे काम केले आहे.
स्तुतीत ते गांधीजींपेक्षाही मोदींना अधिक गुण देतात. ते म्हणाले, ‘‘व्यावहारिक दृष्टिकोनाचा विचार करता मोदी हे गांधीजींपेक्षा एक पाऊल पुढेच आहेत. नवरात्रीत त्यांनी नऊ दिवस उपवास पाळला, पण कामही सुरूच ठेवले. मूल्यांना ते महत्त्व देतात आणि हा देश मूल्यांवरच आधारित आहे. त्यांचे परदेशी बँकेत खाते नाही की गाठीला काळा पैसा नाही. मुलगा नाही की सून नाही. देशाला असाच पंतप्रधान हवा होता.’’‘आयसीसीआर’चे प्रमुख म्हणून आपल्या काय योजना आहेत, या प्रश्नावर ते म्हणाले की, रामायण आणि महाभारत या महाकाव्यांवर आधारित उपक्रमांनी आम्ही इंडोनेशिया, कम्बोडिया, लाओससारख्या दक्षिण आशियाई देशांशी नवे बंध निर्माण करणार आहोत. दक्षिण कोरियातील नागरिकांना भारताशी असलेले प्राचीन संबंध उकलण्यासाठी पुढाकार घेणार आहोत. प्राचीन काळी अयोध्येतील राजकन्येशी राजे किम सुरो यांच्याशी विवाह झाला होता. सध्याच्या अनेक दक्षिण कोरियन नागरिकांची वंशपरंपरा या दोघांपर्यंत पोहोचत आहे, असा दावाही त्यांनी केला.
१९२७मध्ये अंबाला येथे जन्मलेले लोकेश चंद्र यांना संस्कृत, पाली, अवेस्ता, प्राचीन पर्शियन, जपानी, चिनी, तिबेटी, मंगोलियन, इंडोनेशियन, ग्रीक, लॅटिन, जर्मन, फ्रेंच आणि रशियन यांसह १६ भाषा येतात.