मागच्या काही दिवसांपासून देशात करोना व्हायरसचे रुग्ण वाढतायत. त्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान कार्यालयात बैठक सुरु आहे. करोनाच्या नव्या स्ट्रेनने चिंता वाढवली आहे. करोनाच्या या नव्या स्ट्रेनमुळे देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याची शक्यता आहे. आरोग्य सचिव राजेश भूषणही या बैठकीला उपस्थित आहेत. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.
काही राज्यांमध्ये करोना रुग्ण संख्या वाढली आहे. काही ठिकाणी नवीन स्ट्रेन आढळून आले आहेत. व्हायरसमध्ये म्युटेशन म्हणजे परिवर्तन होत असते, त्यातून नव्या स्ट्रेनची निर्मिती होते. महाराष्ट्रात करोना रुग्ण वाढीमागे करोनाचा नवा स्ट्रेन असू शकतो, असे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले होते. ते महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य आहेत.
महाराष्ट्राशिवाय केरळ, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि पंजाबमध्येही करोना रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. व्हायरसच्या जनुकीय रचनेसंदर्भात चाचणीसाठी महाराष्ट्र आणि केरळमधून ८०० ते ९०० नमुने पाठवण्यात आले आहेत, असे आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.
ही नवीन रुग्णवाढ करोनाच्या नव्या स्ट्रेनमुळेच झालीय, हे खात्रीलायकपणे सांगता येणार नाही. त्यासाठी संशोधन सुरु आहे. महाराष्ट्रात अमरावती, यवतमाळमध्ये पुन्हा निर्बंध लागू झाले आहेत. मुंबईत नागरिकांनी करोनाचा फैलाव रोखण्यासाठी नियमांचे पालन केले नाही, तर लॉकडाउन लावण्याचा इशारा देण्यात आला आहे. भारतात यूके स्ट्रेनचे २०० पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. दक्षिण आफ्रिकेतील स्ट्रेन चौघांमध्ये तर ब्राझीलचा स्ट्रेन एका व्यक्तीमध्ये आढळला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 23, 2021 6:00 pm