केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील सक्षम मंत्रिगटाची बुधवारी महाराष्ट्राच्या दुष्काळी भागातील उपाययोजनांबाबत बैठक होणार असून त्या बैठकीत मदतीबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
पुरेशा पावसाअभावी महाराष्ट्रात सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळी स्थिती भीषण झाली आहे. केंद्रीय पथकाने दुष्काळाबाबत एका अहवाल तयार केला असून त्यावर बैठकीत चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
राज्यातील दुष्काळी स्थितीचा सामना करण्यासाठी २२०० कोटी रुपयांची मदत करण्याची मागणी महाराष्ट्र सरकारने केली असून सक्षम मंत्रिगट त्याबाबतही विचार करणार आहे.
राज्यातील सोलापूर, अहमदनगर, सांगली, पुणे, सातारा, बीड आणि नाशिक जिल्ह्य़ांना दुष्काळाचा भीषण तडाखा बसला आहे. त्याचप्रमाणे बुलढाणा, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, औरंगाबाद, जालना, जळगाव आणि धुळे येथील स्थितीही गंभीर आहे.
काही जिल्ह्य़ांमध्ये चारा आणि पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे बहुसंख्य बाधित गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे स्थितीचा त्वरित आढावा घेऊन निर्णय घेण्याचे अधिकार मंत्रिगटाला देण्यात आले आहेत.
सक्षम मंत्रिगटात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, अन्नमंत्री के. व्ही. थॉमस आणि नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉण्टेकसिंग अहलुवालिया यांचा समावेश आहे.