त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असून त्रिपुरा येथे १८ फेब्रुवारी रोजी तर मेघालय व नागालँड येथे २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर या तिन्ही राज्यांमधील मतमोजणी ३ मार्च रोजी होणार आहे. गुरुवारी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन या तिन्ही राज्यांमधील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांमधील विधानसभेचा कार्यकाळ अनुक्रमे ६ मार्च, १३ आणि १४ मार्च रोजी संपुष्टात येणार आहे. तिन्ही विधानसभांमध्ये प्रत्येकी ६० जागा आहेत. २०१३ मध्ये तिन्ही राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम ११ जानेवारी रोजीच जाहीर झाला होता. मात्र, यावेळी १५ जानेवारीनंतरही कार्यक्रम जाहीर होत नसल्याने संभ्रम निर्माण झाला. शेवटी गुरुवारी मुख्य निवडणूक आयुक्त ए. के. जोती यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. तिन्ही राज्यांमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर केला जाईल, असे त्यांनी सांगितले. गुरुवारपासूनच तिन्ही राज्यांमध्ये आचारसंहिता लागू झाल्याचे त्यांनी जाहीर केले.

२०१४ मधील लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने पूर्वोत्तर राज्यांकडे विशेष लक्ष दिले आहे. त्रिपुरामध्ये सीपीआय (एम) समोर भाजपचे आव्हान आहे. त्रिपुरात काँग्रेसची स्थिती फारशी चांगली नाही. भाजपने त्रिपुराकडेही लक्ष दिल्याने यंदा प्रथमच त्रिपुरात सीपीआय (एम) विरुद्ध भाजप अशी लढत रंगेल, असे दिसते. त्रिपुरामध्ये योगी आदित्यनाथ यांची लोकप्रियता वाढली असून निवडणुकीच्या प्रचारात भाजपतर्फे योगी आदित्यनाथांना मैदानात उतरवले जाईल, अशी शक्यता आहे.

नागालँडमध्ये भाजपने नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ) या पक्षाशी युती केली असून नागालँडमधील सत्ता कायम राखण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. नागालँडमध्ये नितीशकुमारांचा जदयू पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. नागालँडमध्ये भाजपने केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांना प्रभारी केले आहे. तर मेघालयमध्ये काँग्रेससमोर सत्ता टिकवण्याचे आव्हान आहे. देशात फक्त पाच राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता असून यात मेघालयचा समावेश आहे. डिसेंबरमध्ये काँग्रेसच्या चार आमदारांनी भाजपत प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.