पाकिस्तानने जम्मू भागात आंतरराष्ट्रीय सीमेवर केलेले शस्त्रसंधीचे उल्लंघन हे दुर्दैवी असून भारत व पाकिस्तान यांच्या लष्करी कारवाई महासंचालकांनी पुन्हा एकमेकांशी संवाद साधून रक्तपात थांबवावा असे जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी सांगितले.

वार्ताहरांशी बोलताना त्या म्हणाल्या की, सीमेवर पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत. लष्करी कारवाई महासंचालकांच्या चर्चेत २००३ च्या शस्त्रसंधी कराराचे पालन करण्याचे ठरले असताना करण्यात आलेली ही कृती दुर्दैवी आहे. दोन्ही देशांकडचे लोक या गोळीबारात मरण पावले आहेत. त्यामुळे लष्करी कारवाई महासंचालकांनी पुन्हा चर्चा करून रक्तपात थांबवावा.

२९ मे रोजी लष्करी कारवाई महासंचालकांमध्ये चर्चा होऊन २००३ च्या शस्त्रसंधीचे पालन करण्याचे ठरले होते. भारताचे लष्करी कारवाई महासंचालक लेफ्टनंट जनरल अनिल चौहान व पाकिस्तानचे समपदस्थ मेजर जनरल साहीरशमशाद मिर्झा यांच्यात चर्चा झाल्यानंतर दोन्ही देशांच्या लष्करांनी पंधरा दिवस शस्त्रसंधीचे पालन करण्याचे जाहीर केले होते.