जम्मू-काश्मीरमधील पिपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी सहा महिन्यामध्ये ८२ लाख रुपये खर्च केल्याचा खुलासा माहिती अधिकार कायद्याअंतर्गत देण्यात आलेल्या एका उत्तरातून झाला आहे. जानेवारी ते जून २०१८ या कालावधीमध्ये मुख्यमंत्री असताना मुफ्ती यांनी ८२ लाख रुपयांमध्ये आपल्या श्रीनगरमधील कार्यालयाचं नुतनिकरण करुन घेतलं. गुपकर मार्गावरील या कार्यलयातील बरीच कामं या कालावधी करण्यात आल्याचं या उत्तरावरुन स्पष्ट होत आहे. तसेच हे सर्व पैसे भारत सरकारने दिल्याची माहितीही देण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरमधील माहिती अधिकार कार्यकर्ते अशणाऱ्या  इनम-उल-नबी सौदागर यांनी दाखल केलेल्या आरटीआय अर्जाला दिलेल्या उत्तरात ही माहिती समोर आलीय. मुफ्ती यांनी फचर्निचर, टीव्ही, चादरी (बेडशीट) आणि इतर गोष्टींवर हे ८२ लाख खर्च केल्याचं नमूद करण्यात आलं आहे.  हा खर्च २०१८ साली जानेवारी ते जून दरम्यान झालाय. तसेच २८ मार्च २०१८ रोजी मुक्ती यांनी २८ लाख रुपयांची कार्पेट विकत घेतली. तर एलईडी टीव्हींबरोबरच इतर सामान विकत घेण्यासाठी मुफ्ती यांनी २२ लाख रुपये जून महिन्यात खर्च केल्याचा तपशील या उत्तरात असल्याचे आयएएनएसने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

या आरटीआय अर्जाला देण्यात आलेल्या माहितीनुसार २०१८ साली ३० जानेवारी रोजी करण्यात आलेल्या खरेदीमध्ये गार्डन अम्ब्रेला म्हणजेच बगिचामध्ये लावण्यात येणाऱ्या छत्र्यांचाही समावेश होता. या छत्र्यांवरच दोन लाख ९४ हजार ३१४ रुपये खर्च झाल्याचं सांगण्यात आलं आहे. तर २२ फेब्रुवारी रोजी ११ लाख ६२ हजारांच्या चादरींची खरेदी झाल्याचे या तपशीलातून दिसून येतं. फर्निचरवर २५ लाख रुपये तर कार्पेटवर २८ लाखांचा खर्च करण्यात आला. तर ऑगस्ट २०१६ ते जुलै २०१८ दरम्यान कटलरी (चाकू कात्री इ. घरगुती उपयोगांची तीक्ष्ण हत्यारे) खरेदी करण्यासाठी ४० लाखांचा खर्च करण्यात आला.

जम्मू काश्मीर सरकारने ऑक्टोबर २०२० मध्ये पीडीपीच्या प्रमुख असणाऱ्या मुफ्ती यांच्यावरील पब्लिक सेफ्टी अ‍ॅक्ट अंतर्गत टाकण्यात आलेली बंधन मागे घेतली. ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीरला देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा केंद्र सरकारने काढून घेत कमल ३७० रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये अनेक स्थानिक नेत्यांना नजरकैदेत ठेवलं होतं.