News Flash

बुरहान वानीप्रकरणी मुफ्तींची पोलिसांना माफीची सूचना!

काश्मीर खोऱ्यात संचारबंदी वाढवली

हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानी चकमकीत ठार झाल्यानंतर काश्मीरमध्ये सुरू झालेल्या हिंसाचाराची धग अद्यापही कायम आहे. सुरक्षा दलांविरोधात जनतेमध्ये असलेला रोष शमविण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी वानीला ठार केल्याबद्दल काश्मीरमधील तरुणांची माफी मागावी, अशी अजब सूचना पोलिसांना केल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

सुरक्षा दलांविरोधातील असंतोष कमी करण्यासाठी मेहबुबा मुफ्ती यांनी पोलिसांना रस्ते आणि पदपथावरून दूर राहण्याची सूचना केल्याचे एका वरिष्ठ पोलिसाने सांगितले. मुफ्ती यांच्या संतुष्टीकरणाच्या भूमिकेमुळे काश्मीर खोऱ्यात हिंसाचार पसरला असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यासह अनेक भागांत पोलिस ठाणी बंद करण्यात आली आहेत. या ठाण्यांतील पोलिसांना केंद्रीय राखीव सुरक्षा दल किंवा लष्कराच्या छावणीत आश्रय घ्यावा लागत आहे. या भागांत काही अधिकाऱ्यांसह पोलिसांना ओळखपत्रेही लपवावी लागत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

काश्मीर खोऱ्यात संचारबंदी वाढवली

काश्मीर खोऱ्यात आणखी काही भागांत संचारबंदी लागू करण्यात आली असून, एका रुग्णालयाच्या बाहेर पेलेट बंदुकीतून झाडलेल्या गोळय़ांनी जखमी झालेल्या एका व्यक्तीचा मृतदेह सापडला, त्यामुळे तेथे निषेधाचे सूर उमटले आहेत. पोटात गोळय़ा लागलेल्या अवस्थेत रियाझ अहमद याचा मृतदेह एसएमएचएस रुग्णालयाबाहेर सापडला असल्याचे पोलिसांनी सांगितले. या युवकाला मारले गेले की नेमके काय झाले हे समजलेले नाही, पण या मृतदेहाचा एक्स-रे काढला असता त्यात पेलेट्स दिसून आल्या. शवविच्छेदन करण्यात आले असून, काही दिवसांनी त्याचा अहवाल येणार आहे.

संयुक्त राष्ट्रांची अखेर माघार

काश्मीरमधील स्थितीवर सतत लक्ष ठेवण्याच्या प्रस्तावावर संयुक्त राष्ट्रांनी काही प्रमाणात माघार घेतली आहे. भारत व पाकिस्तानातील लष्करी निरीक्षक गटांनी काश्मीरवर देखरेख करण्याचे ठरवले होते पण नंतर असे स्पष्टीकरण करण्यात आले की, प्रत्यक्ष ताबारेषेपलीकडे असे निरीक्षण करण्याचा अधिकार या गटाला नाही.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2016 2:56 am

Web Title: mehbooba mufti asked cops to apologise for burhan wani killing
Next Stories
1 वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई
2 इंदू मिलची जागा आंबेडकर स्मारकासाठीच
3 मुंबई – गोवा महामार्ग दुपदरीच
Just Now!
X