घटनेचा अनुच्छेद ३७० पुनस्र्थापित करण्यासाठी, तसेच काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी आपला लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार १४ महिन्यांच्या स्थानबद्धतेनंतर सुटका करण्यात आलेल्या जम्मू- काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी व्यक्त केला आहे. काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याचा केंद्र सरकारचा ५ ऑगस्टचा निर्णय हा ‘दिवसाउजेडीचा दरोडा’ होता, असे त्या म्हणाल्या.

‘गेल्या वर्षी ५ ऑगस्टला जे बेकायदेशीररीत्या, लोकशाहीविरोधी पद्धतीने व घटनाबाह्य़रित्या हिसकावून घेण्यात आले, ते परत घेण्याची प्रतिज्ञा आपण घ्यायला हवी. ज्यासाठी हजारो लोकांनी आपल्या जिवाचे बलिदान केले तो काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठीही आपल्याला काम करावे लागेल’, असे मंगळवारी रात्री ट्विटवर प्रसारित केलेल्या ८३ सेकंदांच्या ऑडिओ संदेशात मेहबुबा यांनी सांगितले.

या मार्गात अनेक अडचणी असल्याने हे काम सोपे राहणार नाही, मात्र आपला खंबीरपणा व निर्धार हे या लढय़ात आपले सोबती असतील, असेही मेहबुबा म्हणाल्या.