जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचे आश्वासन

कथुआ जिल्ह्य़ातील बाकेरवाल येथे एका आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली त्या प्रकरणात योग्य न्याय केला जाईल, आपले सरकार कायद्यात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू देणार नाही, असे जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटले आहे.

या प्रकरणामुळे मोठा वाद निर्माण झाला असून सदर प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द करण्याच्या मागणीसाठी बुधवारी जम्मूतील वकिलांनी बंदचे आवाहन केले होते. मात्र बेजबाबदार कृती आणि एखाद्या समूहाने केलेल्या निवेदनामुळे कायद्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण करू दिले जाणार नाहीत, योग्य पद्धतीचा अवलंब केला जात आहे, तपास शीघ्रगतीने होत आहे आणि योग्य तो न्याय केला जाईल, असे मेहबूबा मुफ्ती यांनी ट्वीट केले आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन, असेही त्या म्हणाल्या.

‘पीडितेला न्याय मिळणारच’

नवी दिल्ली : कथुआमध्ये आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी प्रथमच मत व्यक्त केले आहे. माणूस म्हणून आम्ही अपयशी ठरलो आहोत, मात्र पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे, असे मत सिंह यांनी व्यक्त केले आहे. माणूस आणि पशू यामध्ये फरक आहे, परंतु कथुआमध्ये जो प्रकार घडला ते पाहून माणूस ही शिवी वाटते, पुढील अनेक पिढय़ा लक्षात ठेवतील अशी शिक्षा दोषींना मिळाली पाहिजे, असे सिंह यांनी म्हटले आहे.

कल्पनेपलीकडील क्रौर्य – राहुल गांधी</strong>

कथुआमध्ये आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार कल्पनेपलीकडील क्रौर्य आहे आणि त्याबद्दल दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. या प्रकरणातील दोषींना संरक्षण देण्याची मागणी एखादा कशी करू शकतो, असा सवालही गांधी यांनी केला आहे. या प्रश्नावरून सुरू झालेल्या राजकारणावरही गांधी यांनी ताशेरे ओढले आहेत.

संतप्त प्रतिक्रिया

कथुआ प्रकरणावरून राजकीय नेते, क्रीडापटू, कलावंत अशा समाजातील विविध क्षेत्रांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या दोषींना एखादा कसे काय संरक्षण देऊ शकतो, कथुआमध्ये पीडितेसोबत जे घडले तो मानवतेविरुद्धचा गुन्हा आहे, दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, असे मत व्यक्त होत आहे.