सद्यस्थितीत काश्मीरमधून अफ्स्पा कायदा हटवण्यासारखी परिस्थिती नाही, असे मत जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी व्यक्त केले. काही दिवसांपूर्वी शोपियान जिल्ह्यात भारतीय सुरक्षा दले आणि स्थानिक नागरिकांमध्ये झालेल्या संघर्षात तीन नागरिकांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी काही भारतीय जवानांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर भारतीय लष्करानेही जमावाविरोधात गुन्हा दाखल केला होता. मेहबुबा मुफ्ती यांनी शुक्रवारी विधानसभेत बोलताना लष्कराने दाखल केलेल्या तक्रारीचे समर्थन केले. तसेच या अनुषंगाने काश्मीरमध्ये लागू असलेल्या अफ्स्पा कायद्याबद्दलही भाष्य केले.

भारतीय जवानांवरील गुन्हे मागे घ्या; काश्मीरमध्ये भाजपा आणि पीडीपीत फूट

काश्मीर खोऱ्यात पोलीस आणि सुरक्षा दलांचा वावर कमी होणे गरजेचे आहे. मात्र, दहशतवादी चकमकीच्यावेळी एखादा जमाव हिंसक होऊन सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ले करत राहिले तर तसे होऊ शकणार नाही. उलट अशा हिंसाचारामुळे काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा दलांचा वावर आणखी वाढेल. त्यामुळे सध्याची परिस्थिती काश्मीर खोऱ्यातून अफ्स्पा कायदा मागे घेण्यासाठी योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय सैन्य हे जगातील सर्वात शिस्तप्रिय लष्करांपैकी एक आहे. लष्करासह सुरक्षा यंत्रणांमधील जवानांनी दिलेल्या बलिदानांमुळे आज आपण संसदेमध्ये सुरक्षितरीत्या पोहोचू शकतो, असेही त्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून शोपियान प्रकरणावरून भाजपा आणि पीडीपी यांच्यात फूट पडल्यासारखी परिस्थिती होती. मात्र, मेहबुबा मुफ्ती यांच्या आजच्या वक्तव्याने युतीमधील हा तणाव निवळण्याची शक्यता आहे.