श्रीनगर: भारत सरकार अफगाणिस्तानच्या लोकांच्या हक्कांची काळजी करीत आहे पण तेच हक्क काश्मिरींना नाकारल्याचे सांगत आपल्याला सरकारने नजरकैदेत ठेवल्याचा दावा पीडीपी पक्षाच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी मंगळवारी केला. यापूर्वीही अनुच्छेद ३७० रद्द के ल्यानंतर त्यांना काही काळ नजरकैदेत ठेवण्यात आले होते. मुफ्ती यांनी सांगितले की,  राज्यातील परिस्थिती सुरळीत नसल्याचे सांगून सरकारने आपल्याला नजरकैदेत ठेवले आहे.

एका ट्वीट संदेशात त्यांनी म्हटले आहे की, अफगाणिस्तानच्या लोकांच्या हक्कांबाबत केंद्र सरकारला चिंता आहे पण काश्मिरींना सहेतुक हक्क डावलले जात आहेत. आज आपल्याला नजरकैदेत ठेवण्यात आले असून सरकारने त्यासाठी काश्मीरमधील परिस्थिती सुरळीत नसल्याचे म्हटले आहे, यातूनच परिस्थिती सुरळीत नसल्याची कबुलीच सरकारने दिली आहे. सरकारने परिस्थिती सुरळीत असल्याचे आधी केलेले दावे खोटे ठरले आहेत.

गिलानी यांचा मृतदेह पाकिस्तानी ध्वजात गुंडाळल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याबाबत केंद्रावर रविवारी मेहबुबा मुफ्ती यांनी  टीका केली होती. गिलानी यांच्या निधनानंतर देशविरोधी घोषणाबाजी करण्यात आली होती. काश्मीर हे खुले तुरुंगच असल्याचा दावा करून मेहबुबा यांनी म्हटले आहे की, आता सरकार मृतांनाही सोडायला तयार नाही. लोकांना दु:ख, वेदना व्यक्त करू दिल्या जात नाहीत. अखेरचा निरोप देण्याच्या इच्छाही अपुऱ्या राहत आहेत.

मुफ्ती यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत  म्हटले होते की, पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत २४ जून रोजी झालेल्या बैठकीनंतर पुढे काहीच प्रगती झालेली नाही.  केवळ फोटो काढण्याचे उद्दिष्ट साध्य झाले. अजूनही प्रत्येक जण त्याच चौकटीत आहे.

गिलानी यांच्या कुटुंबीयांवर विध्वंसक कारवाया प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंत्यविधीप्रसंगी त्यांच्या कुटुंबातील महिलांशी करण्यात आलेली वर्तणूक सभ्यतेची नव्हती.  त्यातून भारत सरकारला नेहमीच वाटत असलेले भय व त्यांचा निर्दयीपणा या दोन गोष्टी दिसून येतात. नवीन भारतातील हा नया काश्मीर आहे. मुफ्ती यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत  म्हटले होते की, पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत २४ जून रोजी झालेल्या बैठकीनंतर काहीच पुढे सरकलेले नाही. या सगळ्या घटनाक्रमात केवळ फोटो काढण्याचे उद्दिष्ट साध्य झाले. अजूनही प्रत्येक जण त्याच चौकटीत आहे. प्रत्यक्षात परिस्थिती बदललेली नसून सरकारने त्या बैठकीत विश्वासवर्धक उपाययोजनांची चर्चा केली होती. तुम्ही निदान कोही कैद्यांना सोडणार असाल तर सोडा असे मेहबुबा यांनी म्हटले होते.