#MeToo ही मोहीम सध्या जगभरात गाजते आहे. अनेक महिला त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचार, शोषण, छळ, गैरवर्तन याबाबत समोर येऊन बोलत आहेत. सोशल मीडिया या मोहीमेसाठी सर्वात मोठा मंच ठरला आहे. या मोहिमेची जोरदार चर्चा असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी आणि अमेरिकेच्या प्रथम नागरिक मेलानिया ट्रम्पने MeToo च्या मोहिमेत आरोप करणाऱ्या महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचे सबळ पुरावे द्यावेत असे म्हटले आहे. ज्या मुली, महिला लैंगिक अत्याचार, शोषण, छळ यासंबंधीचे आरोप करत आहेत त्यांना पाठिंबा दिला पाहिजे असेच मलाही वाटते. मात्र त्यांनी या आरोपांचे सबळ पुरावे सादर केले पाहिजेत असे मेलानिया ट्रम्प यांनी म्हटले आहे.

केनिया येथील दौऱ्यादरम्यान एका मुलाखतीदरम्यान मेलानिया ट्रम्प यांनी आपले म्हणणे मांडले आहे. महिलांचे समर्थन केलेच पाहिजे असे माझे मत आहे मात्र पुरुषांचीही बाजू ऐकून घ्यायला हवी असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे. महिला ज्या प्रकारे व्यक्त होत आहेत ती चांगली बाब आहे. त्यांना पाठिंबा दिलाच पाहिजे मात्र पुरुषांचेही ऐकून घ्यायला हवे असेही त्यांनी म्हटले आहे.

अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही गेल्या काही वर्षांमध्ये महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप झाले आहेत. अशात पुरुषांनाही त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार दिला गेला पाहिजे असे मेलानिया ट्रम्प यांनी म्हटले आहे. पुरुषांसाठी सध्याचा काळ काहीसा कठीण आहे. प्रसारमाध्यमेही अनेक बातम्या वाढवून सांगत आहेत. काही बातम्या अशा प्रकारे सादर केल्या जातात ज्यांची पद्धत चुकीची आहे असे मला वाटत असल्याचेही मेलानिया ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

हॉलिवूडमधील लैंगिक शोषण, छळ, गैरवर्तनासंदर्भात मागील वर्षी #MeToo ही मोहीम सोशल मीडियावर सुरु करण्यात आली. तेव्हापासून ही मोहीम जगभरात सुरु आहे. सध्या भारतात अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक गैरवर्तन केल्याचे आरोप केले आहेत. ज्यानंतर ही मोहीम भारतातही सुरु झाली असून अनेक अभिनेत्री, महिला पत्रकार यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे.