ऑस्ट्रेलियातील वणव्यांनी तेथील  मेलबर्न शहरातील हवेचा दर्जा खूपच खालावला असून तो आता जगात अत्यंत वाईट आहे. वणव्यातून निर्माण झालेल्या धुराने मेलबर्न या ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या मोठय़ा  शहराला वेढले आहे.

आतापर्यंत या वणव्यांमध्ये २६ जण ठार झाले असून १ कोटी हेक्टर जमिनीवरील झाडे जळाली आहेत. एकूण २००० घरे जळाली असून प्राणी व पक्ष्यांच्या हजारो प्रजाती आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. दरम्यान हवामान विभागाने सांगितले की, या आठवडय़ात पावसाची शक्यता असून तसे झाले तर त्यामुळे वणव्याने होरपळलेल्या भागांना दिलासा मिळणार आहे.

अनेक अग्निशामक जवान या वणव्यांचा मुकाबला करीत आहेत. ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशनच्या मते पूर्व किनाऱ्यावर विस्तृत प्रमाणावर पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यात वणव्यांच्या भागांचाही समावेश राहील. मेलबर्नच्या हवेचा दर्जा खूपच खालावला असून तो धोकादायक झाला आहे. वणव्यांचा धूर हवेत मिसळल्याने त्याचा वाईट परिणाम झाला. व्हिक्टोरियात एकूण १६ वणवे अजून पेटलेले आहेत. तेथील १४ लाख हेक्टर क्षेत्रातील झाडे जळून गेली आहेत. सिडनीनंतर मेलबर्न हे ऑस्ट्रेलियातील मोठे शहर असून त्याची लोकसंख्या ४२ लाख आहे.

रात्रीतून मेलबर्नच्या हवेचा दर्जा खूपच खराब झाला असून सध्या तरी इतकी खराब हवा जगात कुठेही नाही असे व्हिक्टोरियाचे आरोग्य अधिकारी ब्रेट सुटन यांनी सांगितले. तापमान जास्त असल्याने हवेतील सूक्ष्म कण वाढत असून त्यामुळे दर्जा खराब झाला आहे. ६५ वयावरील व १५ वर्षांखालील लोक यात धोकादायक गटात असून त्यांनी घरात राहणे पसंत केले आहे. हृदय व श्वसनाचे रोग असलेल्या व्यक्तींना प्रदूषणापासून दूर राहण्यास सांगण्यात आले. वणव्यांनी संपूर्ण देशात १ कोटी हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले असून वेल्स भागात ८४ लाख हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे.