* उत्तर प्रदेशच्या लोकायुक्तांचा अहवाल
* दोन माजी मंत्र्यांचाही समावेश
मायावती यांच्या कारकिर्दीत स्मारके आणि उद्याने उभारताना झालेल्या आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी उत्तर प्रदेश लोकायुक्तांनी १९९ जणांवर ठपका ठेवला आहे.
लोकायुक्त एन. के. मल्होत्रा यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना सोमवारी यासंबंधीचा अहवाल सादर केला. राज्यात विविध स्मारके स्मृतिउद्याने उभारण्यासाठी करण्यात आलेल्या आर्थिक तरतुदींच्या ३४ टक्के म्हणजे तब्बल १,४०० कोटी रुपयांचा हा आर्थिक घोटाळा झाला असल्याचे मल्होत्रा यांनी सांगितले. याप्रकरणी, १९ जणांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली तसेच भारतीय दंडविधान कायद्याच्या कलम ४०९ अन्वये प्राथमिक आरोपपत्र दाखल करण्यात यावे, अशी शिफारस आपण केली असल्याची माहिती मल्होत्रा यांनी दिली.
   या १९ जणांमध्ये नसीमुद्दी सिद्दिकी आणि बाबूसिंग कुशावाह हे बसपाचे दोन माजी मंत्री, खाणविभागाचे माजी संयुक्त संचालक एस. ए. फारुकी, राजकीय निर्माण निगमचे माजी व्यवस्थापकीय संचालक सी. पी. सिंग आणि अन्य १५ अभियंत्यांचा समावेश असल्याचे मल्होत्रा यांनी सांगितले.  
त्यापैकी सी. पी. सिंग हे सध्या उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचे तांत्रिक सल्लागार आहेत. उर्वरित संशयित व्यक्तींच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी आणि वैध उत्पन्नापेक्षा त्यांचे उत्पन्न अधिक आढळल्यास त्यांच्याविरोधातही प्राथमिक आरोपपत्र दाखल करण्याची शिफारस लोकायुक्तांनी केली आहे.