दिल्ली न्यायालयाचे मत, बलात्कार प्रकरणातील आरोपी दोषमुक्त
दिल्ली न्यायालयाने बलात्काराच्या एका प्रकरणात वकिलास आरोपमुक्त केले असून खोटय़ा फिर्यादींपासून पुरुषांना वाचवले पाहिजे असे म्हटले आहे.
न्यायालयाने सांगितले की, महिलेने या वकिलावर बलात्काराची फिर्याद दाखल केली होती, पण नंतर तिनेच ती मागे घेतली पण सदर वकील आता या महिलेवर भरपाई मागणारी याचिका दाखल करू शकतो, असे न्यायालयाचे मत आहे.
महिलेने असा आरोप केला होता की, तिच्यावर या वकिलाने न्यायालयातील त्याच्या चेंबरमध्ये वारंवार बलात्कार केला. २०१०-२०१२ दरम्यान ही घटना घडली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश निवेदिता अनिल शर्मा यांनी सागितले की, महिलेच्या या फिर्यादीमुळे वकिलास मनस्ताप व अवमानास सामोरे जावे लागले. त्याशिवाय दाव्याचा खर्चही करावा लागला. समाजात या प्रकरणांचे फार वाईट परिणाम होतात त्यामुळे या वकिलास आम्ही आरोपमुक्त केले तरी त्याची परवड थांबणार नाही. बलात्कार प्रकरणाच्या खटल्यातील आरोपी म्हणून या वकिलावर डाग कायम राहील, त्याचे समाजातील स्थान त्याला परत मिळवून देता येणार नाही, त्याला ज्या गोष्टींना सामोरे जावे लागले त्याची भरपाई कशातही होणार नाही. पुरुषांनाही खोटय़ा प्रकरणांमध्ये अडकवले जात असेल तर त्यांना त्यापासून संरक्षण मिळाले पाहिजे. सगळेजण महिलांचे हक्क, सन्मान व प्रतिष्ठेचा मुद्दा मांडतात, पण या वकील पुरुषावर जो खोटा दावा दाखल करण्यात आला त्यावर चर्चा कुणी करीत नाही.  त्यामुळे याबाबतही आता भूमिका घेण्याची वेळ आली आहे. ही महिला वकिलाकडे कारकून म्हणून काम करीत होती. वकिलाने आपल्यावर दोन वर्षे बलात्कार केला व हे कु णाला सांगितल्यास ठार मारून टाकण्याची धमकी दिली होती, असे तिने फिर्यादीत म्हटले होते. त्यात आरोपपत्र दाखल झाले. वारंवार बलात्काराचे कलम ३७६ (२) व ३५४ ए (लैंगिक छळ), ३५४ डी (पाठलाग करणे), ५०६ (धमकावणे) ही कलमे लावण्यात आली. महिलेने नंतर न्यायालयात माघार घेतली व आरोपी प्रामाणिक असून असा काही प्रकार झाला नव्हता असे स्पष्ट केले. आपल्यावर बलात्कारही झाला नाही व त्याने धमकावलेही नाही, त्यामुळे त्याच्या विरोधात काही तक्रारही नाही, उलट या खटल्यात त्याची मुक्तता व्हावी असेच वाटत होते, असे तक्रारदार महिलेने म्हटले होते. गुन्हेगारी दंडसंहिता कलम ३१३ अन्वये महिलेने केलेल्या निवेदनाआधारे सदर वकिलास बलात्काराच्या आरोपातून मुक्त करण्यात येत आहे असे न्यायालयाने सांगितले.