टोमॅटोचे दर सध्याच्या घडीला गगनाला भिडले आहेत, त्यामुळे टोमॅटो विक्रेत्यांना चोरीची भीती सतावू लागली आहे. चोरी रोखण्यासाठी व्यापारी वेगवेगळे उपाय योजण्यासाठी सज्ज झाले आहेत. याचंच  एक उदाहरण इंदौरच्या बाजारात बघायला मिळालं, कारण इंदौरच्या बाजारात टोमॅटोच्या सुरक्षेसाठी चक्क बंदुकधारी गार्ड तैनात करण्यात आले आहेत. किरकोळ भाजी बाजारात टोमॅटोचा दर १०० रूपये किलो आहे. त्यामुळे टोमॅटो चोरीचं प्रमाण वाढलं आहे. देशातल्या अनेक भागात टोमॅटो चोरीच्या घटना समोर आल्या आहेत.

मुंबईतल्या बाजारपेठेतून दोन दिवसांपूर्वीच एका बाजारपेठेतून ३०० किलो टोमॅटो चोरी झाल्याची बातमी आली होती. या सगळ्या बातम्या लक्षात घेऊन इंदौरच्या व्यापाऱ्यांनी टोमॅटोच्या रक्षणासाठी चक्क गार्ड नेमले आहेत. ‘एएनआय ‘या वृत्तसंस्थेनं या संदर्भातले फोटोही प्रसारीत केले आहेत. महाराष्ट्रानं एक काळ असाही पाहिला आहे की टोमॅटोला बाजार समितीत योग्य दर न मिळाल्यानं उत्पादकांनी ते रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध केला आहे. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर थोडे थोडके नाही तर चांगलेच वाढले आहेत.

घाऊक बाजारात टोमॅटो ७० ते ८० रूपये किलोनं विकला जातो आहे तर किरकोळ बाजारात किलोचा दर १०० ते ११० रूपये इतका प्रचंड आहे. देशातल्या तीन ते चार राज्यांमध्ये झालेले शेतकऱ्यांचे संप, भाज्यांचं आणि खासकरून टोमॅटोचं कमी झालेलं उत्पन्न या सगळ्याचा परिणाम अर्थातच त्याच्या दरांवर झाला आहे. गेल्या आठवड्यापासून फक्त महाराष्ट्रातलाच नाही तर देशात टोमॅटोचा किलोमागचा दर वाढला आहे. याच टोमॅटोची चोरी रोखण्यासाठी आता मध्यप्रदेशात सुरक्षा रक्षक नेमण्यात आल्याचं समोर आलं आहे.

याआधी कांद्याच्या वाढलेल्या दरांनी देशाच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. आता कांद्याचे दर नियंत्रणात आले आहेत. मात्र लालबुंद टोमॅटोचे वाढलेले दर देशाला रडवत आहेत. याच टोमॅटोची चोरी रोखण्यासाठी विक्रेत्यांनी गार्ड नेमले असल्याची बाब समोर आली आहे. उद्या कदाचित आणखीही काही उपाय शोधले गेले तर नवल वाटायला नको. इंदौरच्या बाजारात विक्रेत्यांनी नेमलेल्या या गार्डची योजना देशातल्या इतरही भागात नेमली जाण्याची शक्यता आता नाकारता येत नाही.