ब्रिटनमध्ये एका भारतीय वंशाच्या मुलीला मेन्सा बुद्धय़ांक चाचणीत १६२ गुण मिळाले असून तिने अल्बर्ट आईनस्टाईन व स्टीफन हॉकिंग यांनाही मागे टाकले आहे. ती अवघी बारा वर्षांची आहे.

इसेक्स येथील लिडिया सेबास्टियन हिने मेन्साच्या कॅटेल ३ बी पेपरमध्ये जास्त गुण मिळवले. या परीक्षेत जास्त गुण मिळवणाऱ्यांची संख्या एक टक्का आहे. लिडिया हिने काही मिनिटांतच सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. सुरुवातीला अवघड वाटत होते पण नंतर सुरुवात केल्यावर प्रश्नांची उत्तरे देणे सोपे गेले. नंतर मात्र ताण नाहीसा झाला. अपेक्षेपेक्षा पटापट उत्तरे लिहिता आली असे लिडिया हिने सांगितले. या परीक्षेत भाषेच्या चाचणीचे मोठे आव्हान होते. व्याख्या, तर्कशास्त्र यांचाही कस लागला असे तिने सांगितल्याचे द गार्डियनने म्हटले आहे. लिडियाचे वडील अरूण सेबास्टियन हे कोलचेस्टर रुग्णालयात रेडिओलॉजिस्ट आहेत.
लिडियाने मेन्सा चाचणीचे संकेतस्थळ शोधले व त्यात रस असल्याचे तिने आईला सांगितले. तिने हॅरी पॉटरची सातही पुस्तके तीनदा वाचली आहेत. लिडिया ही इतर क्षेत्रातही हुशार आहे. वयाच्या चौथ्या वर्षांपासून तिला व्हायोलिन येते तर वयाच्या सहाव्या महिन्यात ती बोलायला शिकली.
आईनस्टाईनलाही टाकले मागे
लिडियाने कॅटेल ३ बी प्रश्नपत्रिकेतील दीडशे प्रश्न सोडवले व तिला १६२ गुण मिळाले. यात अठरा वर्षांखालील मुलांना जास्तीत जास्त १६२ गुण मिळू शकतात तर प्रौढांना कमाल १६१ गुण मिळू शकतात. तिने तिच्या गटात कमाल गुण मिळवले आहेत. हॉकिंग व आईनस्टाईन यांचा बुद्धय़ांत १६० असल्याचे मानले जाते.