अ‍ॅप व्यवस्थापक वादिम लाव्रुसिक यांची माहिती
पत्रकारांसाठी एक खुशखबर आता फेसबुकने खास त्यांच्या व्यक्तिगत वापरासाठी मेन्शन्स अ‍ॅप उपलब्ध करून दिले असून त्याच्या माध्यमातून पत्रकारांना त्यांच्या अनुसारकांशी संवाद साधता येईल. शिवाय त्यांचे लेखनही पोहोचवता येईल. पत्रकार या माध्यमातून जास्त माहिती वाचक व अनुसारकांपर्यंत पोहोचवू शकतील. केवळ मित्रांसाठीच नव्हे तर इतर अनुसारकांसाठी (फॉलोअर्स) ही माहिती उपलब्ध राहील. या अ‍ॅपचे उत्पादन व्यवस्थापक वादिम लाव्रुसिक यांनी सांगितले की, पत्रकारच नव्हे तर इतरांनाही ही सुविधा उपलब्ध राहील. ते त्यांच्या अनुसारकांशी संवाद साधू शकतील पण त्यासाठी ते फेसबुक खाते खरे आहे की खोटे हे तपासून मगच ही सुविधा दिली जाईल.
फेसबुक हा पत्रकारांसाठी एक चांगला अनुभव असावा. त्यांना बातम्या गोळा करताना, लोकांशी संपर्क साधताना, त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपयोग व्हावा असा या अ‍ॅपचा हेतू आहे. पत्रकार व ब्लॉगर्स हे नेहमीच सेरेना विल्यम्स किंवा काही सेलेब्रिटीजसारखे प्रसिद्ध नसतात. त्यांना आता समाज माध्यमातून अनुसारक मिळू शकतील. पत्रकारांबरोबर ते काम करतात त्या वर्तमानपत्राची प्रतिमाही त्यामुळे समाजमाध्यमात ठसण्यास मदत होणार आहे. एखादी घटना पाहिल्यानंतर त्याची छायाचित्रे, थेट माहिती, प्रश्नोत्तरे या अ‍ॅपवर टाकता येतील. आतापर्यंत अभिनेते, संगीतकार, अ‍ॅथलीट यांनाच हे अ‍ॅप उपलब्ध होते. आता ते पत्रकार व खरी खाती असलेल्यांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तुमच्या सांगण्यावर समाजाचे मत काय आहे हे समजणार आहे. तुम्ही लोकांशी लाइव्ह व्हिडिओ माध्यमातून संपर्क ठेवू शकणार आहात. मेन्शन्समध्ये स्वारस्य असलेल्यांनी आधी एक ऑनलाईन फॉर्म भरावा व नंतर त्यांना हे अ‍ॅप डाऊनलोड करून वापरता येईल.
फेसबुकने जुलै २०१४ मध्ये मेन्शन्स अ‍ॅप सुरू केले होते पण ते वलयांकित म्हणजे सेलिब्रिटी व्यक्तींसाठी होते. जर फेसबुक वापरकर्त्यांने द रॉक असे स्टेटस अपडेट केले तर तो वापरकर्ता त्याची नवीन माहिती मेन्शन्स अ‍ॅपमध्ये टाकू शकेल व त्यावर प्रतिसादही मिळू शकेल. यात तुमचे खाते खरे की खोटे हे तपासले जाईल. लोकांना त्यातून लगेच प्रतिसाद मिळेल. फेसबुक मेन्शन्स अ‍ॅप तुम्ही टाकलेल्या पोस्टचा कालानुक्रमही दाखवेल. अनुसारक किंवा चाहत्यांशी त्यातून संवाद साधता येणार आहे. न्यूज फीडवरील व्हिडिओ त्यात पाहता येतील. न्यूजफीडमध्ये वलयांकित व्यक्तींच्या प्रक्षेपित व्हिडिओ केव्हा बघता येतील याची पूर्वसूचना तुम्ही जर त्या व्यक्तीच्या संपर्कात असाल तर तुम्हाला दिली जाईल.

मेन्शन्स अ‍ॅप
तुमचे फेसबुक खाते असेल तर एक ऑनलाईन फॉर्म भरून हे अ‍ॅप डाऊनलोड करता येईल
त्यासाठी तुमचे फेसबुक खाते खरे असले पाहिजे
लाइव्ह माहिती, छायाचित्रे, प्रश्नोत्तरे या सुविधा
पत्रकारांसाठी माहिती देवाणघेवाणीचे एक साधन
अर्थात यात कुणीही खोटी माहिती देणे दिशाभूल करणारे ठरू शकते.
वृत्तपत्र व पत्रकाराला समाजाचा प्रतिसाद समजेल