तरुणीवर बलात्कार करून नंतर तिच्या संपूर्ण कुटूंबाला ठार मारणाऱया धरमपाल नावाच्या कैद्याला पुढील आठवड्यात फाशी देण्यात येणार आहे. गेल्या १४ वर्षांपासून प्रलंबित असलेली त्याची दयेची याचिका राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी फेटाळली.
सोनेपतमधल्या धरमपालने १९९१ मध्ये एका तरुणीवर बलात्कार केला. या प्रकरणात तो दोषी असल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. न्यायालयाने त्याला दहा वर्षांची शिक्षा सुनावली. न्यायालयात खटला सुरू असताना धरमपालने संबंधित तरुणीला न्यायालयात साक्ष न देण्याबद्दल धमकावले होते. १९९३ मध्ये धरमपालला पाच दिवसांच्या पॅरोलवर सोडण्यात आले. त्यावेळी त्याने संबंधित मुलीच्या कुटूंबियांची हत्या केली. संबंधित मुलीचे आई-वडील, बहीण आणि दोन भावांची ते झोपेत असताना त्याने हत्या केली.
धरमपाल याचा भाऊ निर्मलनेही या कृत्यामध्ये त्याला मदत केली होती. हरियाणातील न्यायालयाने या दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावली. सर्वोच्च न्यायालयाने १९९९मध्ये धरमपालची फाशीची शिक्षा कायम ठेवली आणि त्याच्या भावाची फाशीची शिक्षा जन्मठेपेमध्ये रुपांतरीत केली. त्यानंतर धरमपालने १९९९ मध्येच तत्कालिन राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज सादर केला होता. त्यावेळी न्यायालयाने तो फेटाळला होता. त्यानंतर २००५ मध्ये पुन्हा त्याने दयेचा अर्ज दाखल केला होता. तो राष्ट्रपतींकडे प्रलंबित होता.