चंदनतस्कर वीरप्पन याच्या चार साथीदारांची दयेची याचिका राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी फेटाळली. १९९३ मध्ये झालेल्या भूसुरुंग स्फोटात दोषी आढळल्याने चौघांनाही न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. ग्नानाप्रकाश, सिमॉन, मिसाई मादायान आणि पिलावेंद्रन अशी या चौघांची नावे आहेत.
बेळगावमधील कारागृहाच्या अधिकाऱयांनी चारही दोषींच्या नातेवाईकांना नोटीस पाठविली असून, त्याची दयेची याचिका फेटाळल्याची माहिती कुटुंबियांना दिली आहे. पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीजचे महासचिव बाळामुरुगन यांनी ही माहिती दिली.
संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफजल गुरुला फाशी देण्यात आल्यानंतर कारागृह अधिकाऱयांनी ही माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. १९९३ साली कर्नाटकातील पालारमध्ये या चौघांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला होता. त्यामध्ये २२ पोलिस कर्मचाऱयांचा मृत्यू झाला होता. २००४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.