उत्तराखंड प्रकरणावरून विरोधकांचा गदारोळ; राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब

उत्तराखंड व अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आल्यामुळे चिडलेल्या काँग्रेसच्या सदस्यांनी सोमवारी संसद अधिवेशनाच्या उत्तरार्धाच्या पहिल्याच दिवशी लोकसभा व राज्यसभेत गोंधळ घातला. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज तीन वेळा स्थगित होऊन दिवसभरासाठी तहकूब झाले. मोदी सरकार विरोधी पक्षांची लोकशाही मार्गाने निवडून आलेली सरकारे उलथून पाडत असल्याचा आरोप काँग्रेस सदस्यांनी केला, मात्र गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी तो फेटाळून लावला.

दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू होताच काँग्रेसच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधीही त्यात सहभागी झाल्या. लोकसभेत काँग्रेसने या मुद्दय़ावर दिलेली कामकाज तहकुबीची सूचना अध्यक्षांनी फेटाळल्यामुळे काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे व त्यांच्या पक्ष सहकाऱ्यांनी हौदामध्ये धरणे दिले. जद(यू) व ‘आप’चे सदस्यही त्यांच्यासोबत होते. ‘हा लोकशाहीचा खून आहे’, असे खरगे म्हणाले.

केंद्र सरकार आमदारांना खरेदी करत असून, भाजप सरकार स्थापण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणत असल्याचा आरोप त्यांनी केला.  हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे यापेक्षा अधिक काही बोलू नका, असे अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी खरगे यांना सांगितले. त्यावर, मी राष्ट्रपती राजवट रद्द करणाऱ्या उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत बोलत नसून, फक्त केंद्राच्या कारवाईबद्दल बोलत असल्याचे खरगे म्हणाले. उत्तराखंड व अरुणाचल प्रदेशातील ‘संकट’ रालोआ किंवा भाजपने निर्माण केलेले नसून ते काँग्रेसमधील अंतर्गत संकट आहे, असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन असल्यामुळे त्यावर विद्यमान रूपात चर्चा होऊ शकत नसल्याच्या अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले.

सरकारवर आरोप

राज्यसभेत विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी हा विषय उपस्थित करताना केंद्र सरकार विरोधी पक्षांना ‘जाणूनबुजून चिथावत असल्याचा’, तसेच सभागृह चालू नये म्हणून गोंधळाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान अरुणाचल प्रदेशातील निर्वाचित सरकार ‘पाडण्यात’ आले आणि तेथे स्वत:चे सरकार स्थापन करेपर्यंत केंद्र सरकार स्वस्थ बसले नाही. यापूर्वीही राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती, मात्र अशा पद्धतीने नाही याचा त्यांनी उल्लेख केला.

‘इशरत’ मुद्दय़ावरून भाजपची टीका

इशरत जहॉँचा मुद्दा सोमवारी लोकसभेत भाजपने उपस्थित केला. दहशतवाद्यांना हुतात्मा ठरवून राष्ट्रीय सुरक्षेशी काँग्रेस तडजोड करत असल्याचा आरोप गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केला. शुन्य प्रहरात भाजपच्या किरीट सौमैय्या यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला. इशरत संदर्भात जी चार कागदपत्रे गहाळ झाली आहे त्याचा उल्लेख अहवालात करण्यात आला आहे काय, अशी विचारणा त्यांनी केली. माजी गृहमंत्र्यांनी पहिल्या प्रतिज्ञापत्रात इशरतला दहशतवादी ठरवले. मात्र दुसऱ्या वेळी ते बदलण्यात आले. सोमय्यांनी या प्रकरणी यूपीए सरकारमधील आणखी एका माजी गृहमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख केला. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी हा मुद्दा उपस्थित करण्यास आक्षेप घेतला. उत्तराखंडचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याचे सांगून परवानगी नाकारता मग हा मुद्दा कसा उपस्थित करता, असा त्यांचा सवाल होता.

चिदम्बरम यांचे प्रत्युत्तर

इशरत जहाँ प्रकरणावरून सातत्याने भाजपकडून टीकेचे लक्ष्य केले जात असल्याने माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम संतप्त झाले. इशरतजहाँ ज्या चकमकीत मारली गेली ती चकमक बनावट होती किंवा नाही हा मुख्य प्रश्न असून त्यापासून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी प्रतिज्ञापत्राचा वाद उकरून काढला जात आहे, असा प्रतिहल्ला चिदम्बरम यांनी चढविला आहे. इशरतजहाँ ज्या चकमकीत ठार झाली ती चकमक बनावट होती किंवा नाही आणि जे चार जण कोठडीत होते ते या बनावट चकमकीत मारले गेले का हा मूळ प्रश्न आहे, असे चिदम्बरम यांनी ट्वीट केले आहे.