भारतीय हवाई दलाने पुलवामा हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. भारताने केलेल्या कारवाईमुळे चिडलेल्या पाकिस्तानने बुधवारी भारतीय हद्दीत घुसखोरी केली. पण भारताने त्यांची विमानं परतवून लावली. भारताने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडले असून त्यावेळी आपले मिग २१ विमान पाकिस्तानी हद्दीत कोसळून विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने ताब्यात घेतलं आहे. विंग कमांडर अभिनंदन यांच्या वडिलांनी मुलाला पाठिंबा आणि शुभेच्छा दिल्याबद्दल देशावासीयांचे आभार मानले आहेत. त्यांनी एक संदेश जारी केला आहे.
अभिनंदनचे वडील सिमहाकुट्टी वर्थमान हे एअर मार्शल पदावर कार्यरत होते. त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे की, ‘तुमच्या काळजी आणि शुभेच्छांसाठी आभार. देवाने आमच्यावर कृपादृष्टी ठेवली आहे त्याबद्दल आभार…माझा मुलगा जिवंत आहे, जखमी नाही, व्यवस्थित आहे…किती धैर्याने तो बोलत आहे…एका खरा जवान…आम्हाला त्याचा अभिमान आहे’.
‘अभिनंदन सुखरुप घरी परत यावा यासाठी तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा त्याच्यासोबत असतील याची खात्री आहे. त्याच्यावर अत्याचार होऊ नयेत यासाठी प्रार्थना. मनाने आणि शरिराने तो सुखरुप घऱी परत यावा यासाठीही प्रार्थना’, असं पुढे त्यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी गरजेच्या वेळी सर्वांनी सोबत दिल्याबद्दल आभार मानले आहेत. तुमच्या पाठिंब्यामुळे आम्हाला बळ मिळत असल्याचंही ते म्हणाले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 28, 2019 12:41 pm