भारतीय बँकांना हजारो कोटींचा गंडा घालून विदेशात पळून गेलेला मद्य व्यापारी विजय मल्ल्याने खळबळजनक दावा केला आहे. भारत सोडण्यापूर्वी आपण अर्थमंत्री अरूण जेटली यांची भेट घेतली होती, असे मल्ल्या याने म्हटले आहे. तडजोडीसाठी मी जेटलींची भेट घेतली होती. बँकांनी माझ्या तडजोडीबाबत प्रश्न उपस्थित केले होते, असे सांगत थकबाकी भरायला आपण तयार असल्याचेही त्याने स्पष्ट केले. लंडन येथील वेस्टमिनिटस्टर न्यायालयात प्रत्यार्पणाबाबत सुनावणी सुरू आहे. सुनावणीदरम्यान भारतीय अधिकाऱ्यांनी विजय मल्ल्याला मुंबईतील ज्या आर्थर रोड कारागृहात ठेवणार आहेत, त्याचा व्हिडिओ सादर केला.

मी या बैठकीबाबत विस्तृत माहिती देऊ शकत नसल्याचे मल्ल्याने पत्रकारांना सुनावणीनंतर सांगितले. मल्ल्या जेव्हा देश सोडून गेला, त्यावेळी अरूण जेटली अर्थमंत्री होते. तडजोडीबाबत मी बँकांना अनेकवेळा पत्र लिहिले होते. पण बँकांनी माझ्या पत्रांबाबतच प्रश्न उपस्थित केले होते. माझ्यावर लावण्यात आलेल्या आरोपांशी मी सहमत नाही. याबाबत न्यायालयाच अंतिम निर्णय घेईल.

भारतीय कारागृहांची स्थिती खूपच वाईट आहे. त्यामुळे आपल्याला भारताकडे सोपवण्यात येऊ नये, अशी विनंती न्यायालयाला केली होती. प्रत्यार्पणापासून बचावण्यासाठीच त्याने असे केल्याचे बोलले जात होते. मल्ल्याच्या विनंतीनंतर ब्रिटिश न्यायालयाने भारतीय अधिकाऱ्यांना कारागृहाचा व्हिडिओ सादर करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे भारतीय अधिकाऱ्यांनी ब्रिटिश न्यायालयात आज व्हिडिओ सादर केला.