करोना संकटाचा सामना करताना संपूर्ण जगभरातील वेगवेगळ्या देशामध्ये करोनावरील लस शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. अनेक देशांमधील वैज्ञानिक करोनावरील लस शोधण्यासंदर्भात काम करत आहे. असं असतानाच दुसरीकडे करोनाबाधितांवर इलाज करण्यासाठी संशोधक सध्या अस्तित्वात असणारी औषधांचा शोध घेऊन त्यांचा अभ्यास करत आहे. याच प्रयत्नांदरम्यान केवळ एका दीड रुपयांच्या गोळीकडे आता जगभरातील डॉक्टरांचे लक्ष लागलं आहे. या स्वस्त औषधाचे नाव आहे मेटफॉर्मिन. या गोळीचा वापर मधुमेहाच्या रुग्णांकडून केला जातो. सध्या ही गोळी करोनाबाधित रुग्णांसाठी वापरली जातं आहे. या गोळीचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत हे विशेष. ‘एसीएन’ या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने चीनमधील डॉक्टरांनी या गोळीसंदर्भात सकारात्मक प्रितिक्रिया व्यक्त केल्याचे वृत्त समोर आलं आहे.

अमेरिकन शास्त्रज्ञांचाही दुजोरा

करोनाचा विस्फोट ज्या वुहानमधून झाला तेथे मेटफॉर्मिनवर संशोधन सुरु आहे. या दरम्यान अशी काही प्रकरणं समोर आली आहे ज्यामध्ये या गोळीचा करोनावरील उपचारामध्ये चांगला परिणाम दिसून आला आहे. तर दुसरीकडे अमेरिकेतील मेन्नेसोटा विद्यापिठामध्येही सहा हजार रुग्णांवर मेटफॉर्मिनचा वापर करण्यात आला. या विद्यापिठामधील संशोधकांनीही गोळी परिणामकारक असल्याचे म्हटले आहे. या गोळीमुळे करोनाबाधित रुग्ण दगावण्याची शक्यता कमी होत असल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे.

ब्रिटनमध्ये आधीपासूनच सुरु आहे वापर

‘द सन’मधील वृत्तानुसार ब्रिटनमधील प्रमुख आरोग्य संस्था असणाऱ्या नॅशनल हेल्थ सर्विसकडून सुरुवातीपासूनच या गोळीचा वापर केला जात आहे. ही गोळी मधुमेहबरोबरच स्थनांचा कर्करोग (ब्रेट कॅन्सर) आणि हृदयाशी संबंधित आजारांवरही परिणामकारक आहे. टाइप टू च्या मधुमेहावरील उपचारासाठी १९५० च्या दशकापासून या गोळीचा वापर केला जात आहे.

चीनमधील  संशोधक म्हणतात…

करोनाचा प्रादुर्भाव ज्या वुहान प्रांतातून सुरु झाला तेथे मेटफॉर्मिन खूपच उपयोगात आल्याचे दिसून आलं. आकडेवारी पाहिल्यास करोनाबाधित मधुमेह असणाऱ्या ज्या रुग्णांना ही गोळी देण्यात आली ते रुग्ण दगावण्याचे प्रमाण ही गोळी न दिलेल्या रुग्णांपेक्षा कमी आहे. म्हणजेच या गोळीच्या मदतीने मधुमेह झालेल्या करोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं. ही गोळी घेऊनही मरण पावलेल्या रुग्णांची संख्या अवघी तीन इतकी आहे. तर ही गोळी न दिलेल्या मात्र मधुमेह असलेल्या दगावलेल्या रुग्णांची संख्या २२ इतकी असल्याचे दिसून आलं. करोनाचा संसर्ग झाल्यामुळे प्रकृती चिंताजनक असलेल्या १०४ रुग्णांचा संशोधकांनी अभ्यास केला. या सर्व रुग्णांना मेटफॉर्मिन देण्यात आली होती. या रुग्णांच्या प्रकृतीची तुलना ही गोळी न मिळालेल्या १७९ प्रकृती गंभीर असणाऱ्या रुग्णांशी करुन अहवाल तयार करण्यात आला आहे.