माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांची बदनामी केल्याप्रकरणी दिल्ली न्यायालयानं पत्रकार प्रिया रामाणी यांना समन्स बजावले आहे. अकबर यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप रामाणी यांनी ऑक्टोबर 2018 मध्ये केला होता. यानंतर अनेक महिलांनी अकबर यांच्याविरोधात लैंगिक छळाचे आरोप केले होते. त्यानंतर झालेल्या टिकेच्या भडीमारानंतर अकबर यांना राजीनामा द्यावा लागला होता.

अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी समर विशाल यांनी रामाणी यांनी 25 फेब्रुवारी रोजी कोर्टात हजर रहावे असे निर्देश दिले आहेत. तसेच रामाणी उच्च न्यायालयात समन्सविरोधात दाद मागू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. भाजपाचे नेता असलेल्या अकबर यांच्याविरोधात अनेक महिलांनी लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. #MeToo चे कँपेन जोरात असताना अनेक बड्या व्यक्तिंविरोधात महिलांनी लैंगिक छळ झाल्याची कैफियत सोशल मीडियावर मांडली होती. परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री असलेल्या अकबर यांच्यावर असे अनेक #MeTooचे आरोप झाल्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला. रामाणी यांच्याविरोधात अकबर यांनी बदनामीचा खटला दाखल केला आहे.

अकबर यांनी व्यावसायिक कारकिर्दीत सोबत काम केलेल्या सहा साक्षीदारांचं म्हणणं कोर्टासमोर नोंदवलं. अकबर यांच्यावर झालेल्या आरोपांनी आपल्याला धक्का बसल्याचं व या आरोपांनंतर अकबर आपल्या नजरेतून उतरल्याचं या साक्षीदारांनी कोर्टाला सांगितलं. तर महिलांशी लैंगिक गैरव्यवहार केल्याचे आरोप अकबर यांनी फेटाळले आहेत. माझ्यावर अत्यंत निंदनीय असा हल्ला करण्यात आला आणि अत्यंत चुकीचे व घाणेरडे आरोप करण्यात आले ज्यामुळे माझं अत्यंत नुकसान झालं असल्याचं अकबर यांनी 31 ऑक्टोबर रोजी कोर्टात सांगितलं. अकबर यांची व्यावसायिक कारकिर्द स्वच्छ होती आणि त्यांच्याविरोधात आम्ही कधी तक्रारी ऐकल्या नाहीत असंही या सहा साक्षीदारांनी कोर्टात सांगितलं आहे.

या साक्षींचा आधार घेत अकबर यांच्या वकिलांनी दावा केला की रामाणी यांनी अकबर यांची पत धुळीला मिळवली आहे जी त्यांनी अनेक दशकांच्या परीश्रमानं मिळवली होती. पत्रकारितेमधील सगळ्यात वाईट व्यक्ती असं अकबर यांचं चित्र रंगवण्यात आल्याचा आरोप त्यांच्या वकिलांनी रामाणी यांच्याविरोधात केला आहे. रामाणी यांना आता दिल्ली कोर्टानं याप्रकरणी समन्स बजावलं आहे व 25 फेब्रुवारी रोजी हजर राहण्यास सांगितलं आहे.