परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर झालेल्या लैंगिक छळाच्या आरोपांसंदर्भात त्यांनीच आपली बाजू स्पष्ट केली पाहिजे असे उत्तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दिले व या वादावर भाष्य करणे टाळले. सोशल मीडियावर ‘मी टू’ ही मोहीम सुरु झाल्यानंतर अनेक महिला पत्रकारांनी अकबर यांनी पत्रकारितेत असताना लैंगिक छळ केल्याचा आरोप केला. त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून याप्रकरणी मोदी सरकारने अद्याप मौन बाळगल्याने विरोधी पक्षांनी टीकेची राळ उडवली आहे. काँग्रेसने तर त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपातील काही सूत्रांनीदेखील अकबर नायजेरियावरून परतल्यावर राजीनामा देतील असा अंदाज वर्तवला आहे.

दरम्यान पत्रकारांशी बोलताना इराणी म्हणाल्या, ज्याच्या संदर्भात लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप आहेत ती व्यक्ती (अकबर) यावर उत्तर देण्यास बांधील आहे. मी तिथे उपस्थित नव्हते. त्यामुळे मी कुणाचीही बाजू मांडू शकत नाही. त्यांनी स्वत: याबाबत निवेदन द्यायला हवे, असे त्या म्हणाल्या. तसेच त्यांनी माध्यमांचेही कौतुक वाटते असे सांगितले. या महिला निर्भयपणे पुढे येत आहेत आणि निर्भयपणे आपली बांजू मांडत आहे हे कातुकास्पद असल्याचे इराणी म्हणाल्या. मात्र, याचवेळी महिलांबाबत बोलताना कुणीही न्यायाधीशाच्या भूमिकेत शिरू नये, कारण या महिलांनी अत्यंत कठीण परिस्थिती अनुभवली आहे, असेही इराणी म्हणाल्या आहेत.

भाजपाच्या महिला मंत्र्यांनी MeToo अभियानाअंतर्गत लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवणाऱ्या महिलांचे कौतुक केले आहे. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, मी अकबर प्रकरणावर बोलण्यास योग्य व्यक्ती नाही. पण मी त्या महिलांच्या साहसाचे समर्थन करते, ज्यांनी लैंगिक शोषणाविरोधात खुलेपणाने भाष्य केले. ज्या महिला या परिस्थितीतून गेल्या आहेत, त्यांचा अनुभव खूपच वाईट असेल. दरम्यान, याप्रकरणी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनीही भाष्य केले आहे.