भारतात मीटू चळवळीला सुरुवात करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता हीने अभिनेते नाना पाटेकर यांना या प्रकरणात क्लीनचीट मिळाल्यानंतर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर याप्रकरणी तीने आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दाद मागितली आहे.

डीएनएच्या वृत्तानुसार, नाना पाटेकर प्रकरणात तनुश्री दत्ताने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे उत्तर मागितले आहे. तीने म्हटले की, मोदीजी भ्रष्टाचार मुक्त भारताचे काय झाले?सातत्याने अपराध करणाऱ्या व्यक्तीकडून देशाच्या मुलीसोबत छळ होतो. जमाव तिच्यावर खुलेपणाने हल्ला करतो, हे वारंवार घडत असले तरी तिला न्याय मिळत नाही उलट तिलाच खोटे ठरवले जाते. तिला धमकावले जाते आणि तिच्यावर दबाव आणला जातो. तिचे करिअर संपवले जाते. दुसऱ्या देशात जाऊन एखाद्या अज्ञातासारखे जीवन जगण्याशिवाय तिच्यासमोर कुठलाही पर्याय ठेवला जात नाही. इतके होऊनही पोलीस म्हणतात की, या मुलीने दिलेली तक्रार खोटी आहे. हेच आपले राम राज्य आहे का? एका हिंदू कुटुंबात जन्म घेतल्यानंतर मी ऐकले होते की, राम नाम सत्य है. तर मग या देशात वारंवार असत्य आणि अधर्मचा विजय का होत आहे? कृपया आपण मला याचे उत्तर द्यावे, अशा शब्दांत तनुश्रीने पंतप्रधान मोदींना या प्रकरणी मध्यस्थी करुन आपल्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे.

तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाच्या केलेल्या आरोपांचे कोणतेही पुरावे आढळले नसल्याचा अहवाल ओशिवरा पोलिसांनी काही दिवसांपूर्वी कोर्टात सादर केला होता. त्यानंतर यावर नाराज झालेल्या तनुश्री दत्ताने मोठी आगपाखड करीत पोलिसांना भ्रष्ट संबोधत त्यांनी नाना पाटेकरांनी क्लीनचीट दिल्याचा आरोप केला होता.

हॉर्न ओके प्लीज या सिनेमातील एका आयटम साँगच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचा आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केला होता. २००८ मध्ये या सिनेमाचे शुटिंग सुरू असताना हा सगळा प्रकार घडल्याचे तनुश्रीने गेल्या वर्षी सांगितले होते. सुमारे दहा वर्षांनी तिने या प्रकरणाला #MeToo प्रकरणात वाचा फोडली होती. २००८ मध्ये हा वाद निर्माण झाल्यानंतर तनुश्रीने हा सिनेमा सोडला. तसेच ती परदेशात वास्तव्यास निघून गेली. गेल्या वर्षी तिने भारतात परतल्यावर अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.