उत्तराखंडमधील भाजपा नेते संजय कुमार यांना लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे पदावरुन हटवण्यात आल्यानंतर पीडित महिलेने संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘संजय कुमार मला अश्लील छायाचित्र पाठवायचा, काही वेळा त्याने कार्यालयातच माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. दोन वेळा त्याने माझे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. मी या प्रकरणी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारही केली होती. पण त्यांनी माझ्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले’, असे पीडितेने म्हटले आहे. या प्रकरणामुळे भाजपाची कोंडी होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सात दिवसांपूर्वी भाजपाने संजय कुमार यांना महासचिवपदावरुन हटवले होते. या पार्श्वभूमीवर संजय कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या महिलेने ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दुरध्वनीवरुन प्रतिक्रिया दिली आहे. संजय कुमार यांनी केलेल्या छळाला महिलेने वाचा फोडली आहे. महिला सांगते, मी भाजपाची कार्यकर्ता आहे. मी मूळची दिल्लीची असून २००६ पासून मी उत्तराखंडमध्ये डेहराडून येथे राहते. मी डेहराडूनच्या भाजपा कार्यालयात डेटा एंट्रीचे काम करायचे. याच सुमारास संजय कुमार यांच्याशी ओळख झाली’, असे महिलेने सांगितले.

‘फेब्रुवारीमध्ये माझ्याकडे पक्षासाठी आलेल्या धनादेशांच्या डेटा एंट्रीचे काम देण्यात आले. मी यासाठी दररोज पक्ष कार्यालयात जायचे. कार्यालयात संजय कुमार माझ्याकडे पाहून अश्लील शेरेबाजी करायचे. किमान दोन वेळा त्यांनी कार्यालयातच चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. ते इंटरनेटवरुन डाऊनलोड केलेले अश्लील छायाचित्र मला पाठवायचे. कधी कधी स्वत:चेही फोटो त्यांनी पाठवले. पण हे फोटो अवघ्या काही सेकदांमध्ये डिलीट केले जायचे’, असे त्या महिलेने सांगितले.

मी यासंदर्भात पक्षातील काही ज्येष्ठ कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेत्यांकडे तोंडी तक्रार केली. पण त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केले. शेवटी मार्च महिन्यात मी कार्यालयात जाणे बंद केल्यावर काही नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधला. संजय कुमार यांच्याविरोधात काही पुरावे आहे का?,अशी विचारणा मला करण्यात आली. मात्र, दुर्दैवाने माझ्याकडे एकही पुरावा नव्हता’, असे महिलेने सांगितले.

‘पुरावे गोळा करण्यासाठी मी फोन रेकॉर्डिंग करायला सुरुवात केली. पुरावे गोळा झाल्यावर मी संजय कुमार यांना हे प्रकार थांबवा अन्यथा पुरावे वरिष्ठांकडे देऊ असे सांगितले होते. यानंतर ४ ऑक्टोबर रोजी संजय कुमार यांच्या समर्थकांनी माझा फोन हिसकावून घेतला. मी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रारही केली. पण पोलिसांनी त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

धारा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक कुलदीप पंत यांनी महिलेचा दावा फेटाळून लावला. महिलेने फोन हिसकावून घेतल्याची तक्रार दिली होती. पण चौकशीत दोन दिवसांनी महिलेला तिचा फोन परत केल्याचे समोर आले होते, असे त्यांनी सांगितले. तर उत्तराखंडमधील भाजपा प्रदेशाध्यक्ष अजय भट्ट यांनी ‘माझ्याकडे कोणत्याही महिलेने संजय कुमारांविरोधात तक्रार केली नव्हती. संजय कुमार दोषी असतील तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईलच, असे त्यांनी सांगितले. संजय कुमार हे संघाची माजी प्रचारक असून गेल्या सात वर्षांपासून ते भाजपाचे उत्तराखंडमधील महासचिव होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Metoo uttarakhand bjp leader sanjay kumar sexual harassment complainant reaction
First published on: 16-11-2018 at 08:08 IST