पत्रकार प्रिया रमाणी यांची दिल्ली न्यायालयाने अब्रुनुकसानीच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली आहे. माजी केंद्रीय मंत्री एम.जे.अकबर यांनी प्रिया रमाणी यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. दिल्ली न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे एम.जे.अकबर यांच्यासाठी एक झटका आहे. निकालानंतर प्रितिक्रिया देताना प्रिया रमाणी यांनी, त्यांचा खटला लढवणाऱ्या वकिलांच्या टीमचे आभार मानले आहेत.
“या निकालासाठी मी माझ्या वकिलांचे आभार मानते. मला वकिलांची खूप सुंदर टीम मिळाली” असे रमाणी यांनी म्हटले आहे. २०१८ साली #MeToo ची चळवळ सुरु असताना प्रिया रमाणी यांनी एम.जे.अकबर यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले होते.
जगभरात MeTooच्या चळवळीने जोर धरल्यानंतर पत्रकार प्रिया रमाणी यांच्यासह २० महिलांनी माजी केंद्रीय मंत्री एम.जे. अकबर यांच्याविरुद्ध लैंगिग शोषण केल्याचा आरोप केला होता. प्रिया रमाणी यांसदर्भात ट्विट करून झालेला प्रकाराबद्दल पहिल्यांदाच वाच्यता केली होती. प्रिया रमाणी यांच्या तक्रारीनंतर एम. जे. अकबर यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. याप्रकरणी अकबर यांनी प्रिया रमाणी यांच्यामुळे आपली बदनामी झाल्याचा आरोप केला होता.
न्यायालयाने निकाल देताना काय म्हटलं?
“ज्या ठिकाणी महिलांच्या सन्मान करायला सांगणारे महाभारत आणि रामायण लिहिलं गेलं, तिथे महिलांविरुद्ध अशा घटना घडत असतील तर हे लज्जास्पद आहे. समाजात प्रतिष्ठा असलेला माणूसही लैंगिक शोषण करू शकतो. जे आरोप केले गेले आहेत, ते सामाजिक प्रतिष्ठेला जोडून आहेत. पण लैंगिक अत्याचार आणि शोषणाचा पीडितांवर होणारा परिणाम समाजाने समजून घ्यायला हवा. महिलांना अनेक दशकांनंतरही तक्रार करण्याचा अधिकार आहे,” असं सुनावत न्यायालयाने प्रिया रमाणी यांची मानहानीच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 17, 2021 5:08 pm