तृतीयपंथीयांना समाजात सन्मानानं जगता यावं म्हणून शासन स्तरावर अनेक प्रयत्न केले जात आहे. सामाजिक बदलाचा भाग म्हणून दिल्लीतील मेट्रो प्रशासनानं दिल्लीतील एका मेट्रो स्टेशनचं नामकरण शी मॅन स्टेशन असं केलं आहे. या स्टेशनच्या माध्यमातून तृतीयपंथीयांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यांच्या विशेष सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

नोएडा-ग्रेटर नोएडातील सेक्टर ५० मेट्रो स्थानकाचं नामकरण शी मॅन स्टेशन असं करण्यात आलं आहे. या निर्णयाविषयी बोलताना मेट्रोच्या व्यवस्थापक ऋतू माहेश्वरी म्हणाल्या की, “हे पाऊल नोएडा मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन व तृतीयपंथी समुदायाच्या सहाय्यानं टाकण्यात आलं आहे. शी मॅन स्टेशन पिंक स्टेशनच्या धर्तीवरच तयार करण्यात येईल. पिंक स्थानकाचं उद्घाटन या वर्षी ८ मार्च रोजी करण्यात आलं होतं. या स्टेशनवर महिला प्रवाशांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पिंक स्टेशनवर नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांपैकी फक्त सुरक्षा रक्षक सोडले, तर सर्वच कर्मचारी महिला आहेत. याच प्रकारे शी मॅन स्टेशनवर तृतीयपंथी समुदायाला सहभागी करून घेतलं जाणार आहे,” असं त्यांनी सांगितलं.

हे स्टेशनवर तृतीयपंथी व्यक्तीसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्या, तरी शी मॅन स्टेशन सर्वासाठीच सुरू असेल, त्याचबरोबर तृतीयपंथीयांसाठी सुविधा पुरवण्यात येतील. रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या स्टेशनच्या माध्यमातून तृतीयपंथीयांविषयी जागरुकता व संवेदनशीलता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी स्टेशनवर वेगवेगळे बोर्ड लावण्यात येतील. तिकीट खिडकी तसेच इतर ठिकाणीही तृतीयपंथी व्यक्तींचा समावेश केला जाणार आहे.