मॅक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रे मैन्युल लोपेज ओब्राडेर यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. ओब्राडेर यांनी देशातील करोना परिस्थिती ज्या पद्धतीने हाताळली आहे त्यावरुन अनेकदा त्यांच्यावर टीका झालेली आहे. एकीकडे जगभरातील नेते करोना कालावधीमध्ये सुरक्षेचा उपाय म्हणून मास्क घालण्याचं आवाहन करण्याबरोबरच प्रत्यक्ष कृतीमधून मास्कचे महत्व पटवून देत असतानाच दुसरीकडे ओब्राडेर यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालायला विरोध करत मास्क न घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळेच आता ओब्राडेर यांना करोना संसर्ग झाल्यानंतर ते पुन्हा चर्चेत आलेत.

नक्की वाचा >> एक दोन नाही तब्बल ३१ वेळा ‘ति’च्या करोना चाचणीचे रिपोर्ट्स आले पॉझिटिव्ह

ओब्राडेर यांनी ट्विटरवरुन आपल्याला करोनाचा संसर्ग झाल्याचं सांगितलं आहे. माझ्या शरीरामध्ये करोनाची काही लक्षणं दिसून आली आहेत, असं ओब्राडेर यांनी म्हटलं आहे. सध्या मी डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. “मला हे सांगताना दु:ख होतं आहे की मला करोनाचा संसर्ग झालाय. मात्र माझ्यात करोनाची सूक्ष्म लक्षणं दिसत आहेत. वैद्यकीय पथक माझी तपासणी करत आहे. नेहमीप्रमाणे मी या परिस्थितीमध्येही आशावादी आहे,” असं ओब्राडेर म्हणालेत.

(फोटो सौजन्य: रॉयटर्स)

ओब्राडेर हे आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी संवाद साधणार होते. रशियामधील करोनाची लस स्फुटनिक व्हीच्या खरेदीसंदर्भात ओब्राडेर पुतीन यांच्याशी महत्वाची चर्चा करण्याची आणि याचसंदर्भात अंतिम निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मॅक्सिकोमध्ये अद्याप लसीकरण सुरु झालेलं नाही. मात्र फाइजर करोना लसीचा तुटवडा असल्याने आपली मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार इतर देशांची मदत घेत आहे.

मॅक्सिकोमध्ये करोनामुळे आतापर्यंत दीड लाखांहून अधिक जणांना मृत्यू झाला आहे. तर करोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या १७ लाखांपर्यंत पोहचलीय. नाताळ आणि नवीन वर्षांच्या सुट्ट्यांनंतर देशातील करोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढू लागलाय.