तीन महिन्यांपासून अधिकृत वाहन म्हणून वापर
संसद भवनातील सुरक्षा अधिकाऱ्यांसमोर २ मार्चला कठीण प्रसंग उद्भवला. भवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर एक पांढऱ्या रंगाची ऑटोरिक्षा उभी होती. राजनैतिक अधिकाऱ्यांच्या वाहनाला लावण्यात येणारी ‘डिप्लोमॅटिक नंबरप्लेट’ असलेल्या या ऑटोरिक्षावर मेक्सिकोचा राष्ट्रध्वज लावण्यात आला होता. चालकाने सूट घातला होता आणि प्रवासी होत्या मेक्सिकोच्या राजदूत मेल्बा प्रिआ! गेल्या तीन महिन्यांपासून त्या याच वाहनाचा वापर करीत आहेत.
‘मला वाहतुकीचे हे साधन खूप आवडते. दिल्लीतील बहुतेक नागरिक प्रवासासाठी ऑटोरिक्षाचा वापर करतात. मग, मी का हे वाहन वापरू नये, असा विचार केला आणि माझी ऑटोरिक्षा सफर सुरू झाली. आमचे परराष्ट्रमंत्री भारतात आले तेव्हा आम्ही याच ऑटोरिक्षाचा वापर केला. आमच्या सुंदर देशाचा प्रचार करण्याचा हा उत्तम मार्ग आहे,’ असे मेल्बा प्रिआ यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.
मेक्सिकोचे कलाकार सेन्कोई यांनी सजवलेली मेल्बा प्रिआ यांची ऑटोरिक्षा आनंद निकेतनमधील दूतावासाजवळ दिमाखात उभी असते. या रिक्षाला १एने संपणारा नोंदणी क्रमांक देण्यात आला असून, हे वाहन प्रिआ यांचे अधिकृत वाहन ठरले आहे. रिक्षाला रंगरूप देऊन तिच्या रचनेत बदल करण्यासाठी आठवडा लागला. मात्र, रिक्षा खरेदीसाठी मोठा कालावधी लागला. आधी रिक्षाच्या मॉडेलची निवड करून ‘डिप्लोमॅटिक नंबरप्लेट’साठी परराष्ट्र मंत्रालयाकडे कागदपत्रे सादर करण्याच्या प्रक्रियेसाठी महिना लागला, असे प्रिआ म्हणाल्या.
चालक राजेंद्र कुमार यांना याआधी रिक्षा चालविण्याचा अनुभव नव्हता. ते २००९ मध्ये दूतावासात खासगी वाहनचालक म्हणून रुजू झाले आहेत. ही रिक्षा चालविणे अंगवळणी पडण्यासाठी आठवडा लागला, असे राजेंद्र कुमार यांनी सांगितले.