मेक्सिकोतील ओकांपो शहरात महापौरपदाच्या उमेदवाराची हत्या झाल्याची घटना घडली असून या घटनेनंतर शहरातील पोलीस खात्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच अटक करण्यात आली आहे.

मेक्सिकोतील ओकांपो शहरातील महापौरपदाच्या निवडणुकीतील उमेदवार फर्नांडो हुआरेज यांची गेल्या आठवड्यात गुरुवारी तीन हल्लेखोरांनी हत्या केली होती. फर्नांडो हे प्रचाराची तयारी करत असताना तीन जणांनी त्यांना गाठले आणि गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.

फर्नांडो यांच्या हत्येनंतर सुरक्षा दलाच्या पथकाने शनिवारी शहरातील नागरी सुरक्षा विभागाचे प्रमुख ऑस्कर गोंझालेझ गार्सिया यांना चौकशीसाठी समन्स बजावले. मात्र, स्थानिक पोलिसांनी या कारवाईला विरोध दर्शवला. पोलिसांनी कारवाईदरम्यान हवेत गोळीबारही केला. अखेर सुरक्षा दलाने पोलीस दलातील २७ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अटक केली.

मेक्सिकोत सप्टेंबरपासून राजकीय वादातून जवळपास १२० जणांची हत्या झाली असून १ जुलैपासून सर्वसाधारण निवडणुकांना सुरुवात होणार आहे.