आण्विक पुरवठादार गटाचा (एनएसजी) सदस्य होण्यासाठी भारताला मेक्सिकोचाही पाठिंबा मिळाला आहे. ४८ सदस्यांच्या एनएसजीच्या व्हिएन्नात होणाऱ्या बैठकीच्या तोंडावर स्वित्र्झलड व अमेरिकेच्या पाठोपाठ मिळालेला हा पाठिंबा महत्त्वाचा मानला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या व्यापक चर्चेनंतर मेक्सिकोचे अध्यक्ष एन्रिक पेना निएटो यांनी एनएसजीच्या सदस्यत्वासाठी भारताला आपल्या देशाचा पाठिंबा जाहीर केला. व्यापार व गुंतवणूक, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा व अंतराळ विज्ञान यासह अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून दोन्ही नेत्यांनी ही चर्चा केली.
एनएसजीचा भाग होण्याच्या भारताच्या प्रयत्नांना भारत मान्यता देतो. अण्वस्त्र प्रसारबंदीच्या आंतरराष्ट्रीय अजेंडय़ाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवलेली बांधिलकी लक्षात घेऊन, भारताच्या विनंतीला एक देश म्हणून आम्ही सकारात्मकरीत्या व रचनात्मकरीत्या पाठिंबा देतो, असे निएटो यांनी मोदी यांच्यासोबत पत्रकारांना संबोधित करताना सांगितले.
मेक्सिकोने भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मोदी यांनी त्या देशाच्या अध्यक्षांचे आभार मानले आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षेत मेक्सिको हा महत्त्वाचा भागीदार असल्याचे सांगितले. आपले संबंध सामरिक भागीदारीत वृद्धिंगत करण्यासाठी ‘ठोस परिणामांचा आराखडा’ तयार आणि विकसित करण्यास दोन्ही देश सहमत झाले असल्याचेही ते म्हणाले.
एनएसजीचा महत्त्वाचा सदस्य असलेल्या स्वित्र्झलडला मोदी यांनी सोमवारी भेट दिल्यानंतर, अण्वस्त्र प्रसारबंदीबाबतच्या अत्यंत आग्रही भूमिकेमुळे ओळखल्या जाणाऱ्या या देशानेही भारताला सदस्यत्वासाठी पाठिंबा जाहीर केला होता.
अण्वस्त्र प्रसारबंदीबाबतचा भारताचा इतिहास लक्षात घेऊन अमेरिकेसह एनएसजीच्या अनेक सदस्यांनीही भारताला पाठिंबा दिला आहे. या गटाचा सदस्य झाल्यास भारताला त्याच्या अणुऊर्जा क्षेत्राचा महत्त्वपूर्ण विस्तार करणे शक्य होणार आहे. या आठवडय़ाच्या सुरुवातीला अण्वस्त्र प्रसारबंदीविरोधी महत्त्वाचा गट असलेल्या ‘मिसाइल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिम’ (एमटीसीआर) चे सदस्यत्व मिळण्यातील सर्व अडथळेही भारताने दूर केले होते. या गटाच्या सदस्यत्वामुळे भारताला उच्च दर्जाच्या क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान मिळवण्यास मदत होणार आहे.