एरोमेक्सिको कंपनीचे विमान उड्डाणानंतर कोसळून उत्तर मेक्सिकोत ९७ जण जखमी झाले. वादळामुळे हे विमान लगेचच कोसळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हे विमान द्युरांगो येथून मेक्सिको सिटीला जाणार होते. स्थानिक प्रमाणवेळेनुसार दुपारी तीन वाजता ते कोसळले. एम्ब्रेअर १९० प्रकारच्या या विमानात ८८ प्रौढ, नऊ अल्पवयीन व दोन बालके, दोन वैमानिक, दोन कर्मचारी असे एकूण ९७ जण होते.

एअरलाईन्सचे महासंचालक अँद्रेस कोनेसा यांनी सांगितले, की या अपघातात कुणाचाही मृत्यू झालेला नाही. या अपघातात दोन गंभीर जखमी  झाले असून त्यात वैमानिकाच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून एक तरूण मुलगी २५ टक्के भाजली आहे.

अपघातानंतर  एकूण ९७ जणांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील अनेक जण किरकोळ जखमी असल्याचे द्युरांगो नागरी संरक्षण विभागाचे प्रवक्ते अलेजांद्रो काडरेझा यांनी सांगितले. विमान गारांच्या वादळाने कोसळले व त्यानंतर वैमानिकाने आपत्कालीन अवतरण करण्याचा प्रयत्न केला, त्यात विमानाला आग लागली.

कर्मचाऱ्यांनी जी व्यावसायिक कुशलता दाखवली ती महत्त्वाची आहे, असे कोनेसा यांनी सांगितले. एम्ब्रेअर हे विमान ब्राझीलच्या कंपनीने तयार केलेले असून या कंपनीचे पथक तपासासाठी येत आहे. अनेक किरकोळ जखमी विमानातून बाहेर पडताना दिसत होते. ड्रोनच्या मदतीने घेतलेल्या छायाचित्रात हे विमान धावपट्टीच्या टोकाला असलेल्या शेतात पडलेले दिसत आहे. रोसास यांनी सांगितले की, प्रवाशांनी एकमेकांना मदत केली. जुलै १९८१ मध्ये एरोमेक्सिकोच्या विमानाला झालेल्या अपघातात ३२ जण ठार झाले होते.