काही महिन्यांपूर्वी गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांमध्ये झालेल्या संघर्षानंतर देशभरातून चीनविरोधी भावना जोर धरू लागली होती. अनेकांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. दोन्ही देशांमधील सीमेवरील तणाव अद्यापही निवळलेला नाही. परंतु असं असलं तरी चीनची ऑटो कंपनी SAIC मोटर्सचे भारतीय युनिट एमजी मोटर्सनं पुढील वर्षभरात भारतात १ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या क्षमतेचा विस्तार करण्यासाठी ही गुंतवणूक केली जाणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, एमजी मोटर्सनं आपल्या वाहनांच्या देशांतर्गत निर्मितीवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा थेट अर्थ असा की ही कंपनी भारतातच आपल्या वाहनांचं उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बिझनेस स्टँडर्डनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

“आतापर्यंत आम्ही भारतात ३ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. याव्यतिरिक्त हलोल येथील प्रकल्पात १ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहोत. नव्या लाँचिंगवर लक्ष केंद्रित करणं हा आमचा उद्देश आहे. तसंच देशांतर्गत उत्पादन वाढवण्याचा आणि क्षमता वाढवण्यासाठी ही गुंतवणूक केली जात आहे,” अशी प्रतिक्रिया एमजी मोटर्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा यांनी सांगितलं.

एमजी मोटर्सनं हलोल येथील जनरल मोटर्सच्या प्रकल्पाचं अधिग्रहण केलं आहे. २०१७ मध्ये जनरल मोटर्सनं आपला भारतातील व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले असतानाच एमजी कंपनीच्या भारतातील गुंतवणुकीचं वृत्त समोर आलं आहे. “राजकीय तणाव काही ठराविक वेळेसाठीच राहतो. परंतु जागतिक स्तरावर एकमेकांवर अवलंबून राहावं लागतं. अशातच व्यवसाय, तंत्रज्ञान आणि कल्पनांची मोठ्या कालावधीसाठी घेवाणदेवाण सुरूच राहणार आहे. काही काळासाठी यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते परंतु त्यात काही करता येणार नाही. अनेकदा असेही ग्राहक असतात ज्यांना एका ठराविक देशाच्या सामानाची खरेदी करायची नसते. परंतु जागतिक वाहन क्षेत्रात ग्राहक अनेक गोष्टींचा विचार करून निर्णय घेतात,” असंही छाबा म्हणाले.