भारताच्या अमेरिकेतील राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांच्या प्रामाणिकपणावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. खोब्रागडे यांनी कल्पना असतानाही मुलांसाठी दोन देशांचे पारपत्र बाळगत कायद्याचे उल्लंघन केले असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
खोब्रागडे यांच्यामुळे अमेरिका व भारतादरम्यान वाद निर्माण झाला होता. यावर मंत्रालयाने खोब्रागडे यांनाच कारणीभूत धरत दिल्ली उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र गेल्या महिन्यात सादर केले आहे. खोब्रागडे यांनी त्यांच्या दोन अल्पवयीन मुलींची दोन पारपत्रे बनविली होती. भारतीय कायद्यामध्ये भारताचे नागरिकत्व घेतलेले असताना दुसऱ्या देशाचे पारपत्र घेणे गुन्हा आहे. या संदर्भात दिल्ली न्यायालयाने १५ मे रोजी परराष्ट्र मंत्रालयाकडे खुलासा मागितला होता. या प्रतिज्ञापत्रामध्ये खोब्रागडे यांच्या प्रामाणिकपणावर संशय घेतला आहे. त्यांनी आपल्या मुलींकडे अमेरिकेचे पारपत्र असल्याची बाब मंत्रालयापासून लपवून ठेवली होती. खोब्रागडे यांना भारतीय कायद्याचे उल्लंघन करत असल्याची कल्पना असूनही त्या असे वागल्याने त्या कारवाईस पात्र ठरत असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच त्या न्यायालयासमोर आपल्या दोन अल्पवयीन मुलींची ढाल करून भावनिक बनत आहेत. खोब्रागडे यांनी भारतीय नागरिकत्व कायदा १९५५ आणि पारपत्र कायदा १९६७ यांचे उल्लंघन केले असल्याचा आरोप मंत्रालयाने केला आहे.
खोब्रागडे यांनी आपला बचाव करताना आपल्या मुलींना अमेरिकेचे पारपत्र मिळावे यासाठी अर्ज केला होता. मुलींना अमेरिकेला एकटय़ाने प्रवास करता यावा, असा यामागे उद्देश असल्याचे मंत्रालयाला सांगितले होते. मात्र हा खुलासा परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळून लावला होता. खोब्रागडे यांनी आपल्या मोलकरणीचा छळ केल्याने त्यांना अमेरिकेच्या पोलिसांनी डिसेंबर २०१३मध्ये अटक केली होती. यानंतर अमेरिका व भारतादरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.