भारत पाकिस्तानचा सीमा भाग पाकिस्तानच्या घुसखोरीमुळे कायम चर्चेत असतो. मात्र आपल्या याच सीमेसंदर्भात फोटो देताना केंद्रीय गृह खात्याने अकलेचे तारे तोडले आहेत. स्पेन आणि मॉरक्कोच्या सीमारेषेचा फोटो दाखवत चक्क ती भारत आणि पाकिस्तानची सीमारेषा असल्याचा फोटो प्रसारित केला आहे. या फोटोची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर खिल्ली  उडवण्यात येत आहे. या घटनेनंतर गृहमंत्रालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. आपल्या सीमारेषेवर फ्लडलाईट्सही लावण्यात येतात ज्याच्या आधारे घुसखोरांचा शोध घेता येतो. हेच लाईट्स लावण्यात सीमेवर लावण्यात आल्याचा जो फोटो केंद्रीय गृहमंत्रालयाने प्रसारित केला आहे तो फोटो स्पेन आणि मॉरक्कोच्या सीमारेषेचा आहे. हा फोटो २००६ मध्ये घेण्यात आला होता. जो झेवियर मोरानो या फोटोग्राफरने घेतला होता.

स्पेन आणि मॉरक्कोच्या सीमेवर असलेले फ्लडलाईट्स दाखवण्यासाठी मोरानोने हा फोटो काढला होता. हा फोटो भारताच्या केंद्रीय गृहमंत्रालयाकडे कसा आला? याचे उत्तर मिळालेले नाही. मात्र हा फोटो भारत आणि पाकिस्तानच्या सीमेचा फोटो या ओळी लिहून दाखवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. नासा या अमेरिकेच्या सगळ्यात मोठ्या वैज्ञानिक संस्थेकडेही भारत पाकिस्तान सीमेवरचा फ्लडलाईट्सचा फोटो आहे. अशात भारताने हा फोटो आपल्या दस्तावेजात कसा काय घेतला? हा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून केंद्रीय गृहसचिव राजीव महर्षी यांनी या फोटोसंदर्भात चौकशी सुरू असून चूक झाली असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करू असे म्हटले आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, सीमा सुरक्षा दलांकडून हा फोटो आला का? याचीदेखील चौकशी सध्या करण्यात येते आहे. स्पेन आणि मॉरक्कोची सीमारेषा मेलिला या भागात आहे, फ्लड लाईट लावल्यावर भारत पाकिस्तान आणि ही सीमा रेषा दोन्ही सारख्याच दिसतात त्यामुळे हा घोळ झाला आहे का? याचीही चौकशी सुरू आहे. मात्र केंद्रीय गृहमंत्रालयाच्या या अजब फोटोमुळे केंद्राचे अधिकारी झोपेत आहेत का? असा प्रश्न आता लोकांना पडला आहे.