भारतीय मुलीसह तीन ठार

एकोणीस वर्षांच्या भारतीय मुलीसह तीन जण अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात दोन लहान विमानांच्या हवेतील टकरीत मरण पावले. प्रशिक्षक चालवत असलेली ही विमाने फ्लोरिडा एव्हरग्लेडसमधील मायामी येथे आकाशात एकमेकांवर आदळली, असे मायामी हेराल्डने म्हटले आहे.

पायपर पीए ३४ व सेसना १७२ या मायामी येथील हवाई प्रशिक्षण संस्थेची ही विमाने होती. या विमानांना अपघातांची परंपराच असून २००७ ते २०१७ दरम्यान त्यांना किमान १२ हून अधिक अपघात झाले आहेत. तीन जण मरण पावल्याचे पोलिसांनी सांगितले असून यात चौथ्या व्यक्तीचा समावेश असल्याबाबत चौकशी सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निशा सेजवाल, जार्ज सँचेझ व राल्फ नाइट (७२) यांचा मृतांत समावेश आहे. भारतीय मुलीने या वैमानिक प्रशिक्षण संस्थेत सप्टेंबर २०१७ मध्ये नाव नोंदवले होते. तिच्या फेसबुक पेजवर ही माहिती दिली आहे. विमानांचा ढिगारा व तीन मृतदेह दिसले आहेत. प्राथमिक माहितीनुसार दोन्ही विमाने प्रशिक्षण उड्डाणावर असताना हा अपघात झाला, असे मायामीचे पोलीस प्रवक्ते अलव्हारो झाबालेटा यांनी सांगितले. शोध व मदतकार्य कमी दृश्यमानतेमुळे थांबवण्यात आले आहे.

विमानतळाजवळच्या तळ्यात मासेमारी करणाऱ्या डॅनियल मिरालीस याने सांगितले की, दोन्ही विमानांची टक्कर मी पाहिली असून त्यांचा ढिगारा कोसळतानाचे चित्रण सेलफोन वर केले आहे. अतिशय मोठा आवाज यावेळी झाला.

१८ चाकांची गाडी ताशी शंभर मैल वेगाने जाताना व्हावा तेवढा आवाज झाला. डीन इंटरनॅशनलच्या संकेतस्थळाने म्हटले आहे की, आम्ही विद्यार्थी वैमानिकांना खासगी व व्यावसायिक वैमानिकांकडून प्रशिक्षण देत असतो.