अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाचा निवडणुका आता जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तशा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही वाढू लागल्या आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी मंगळवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसंच त्यावेळी त्यांनी ट्रम्प हे वर्षद्वेषी असल्याचा आरोपही केला. डोनाल्ड ट्रम्प हे वर्णद्वेषी आहेत आणि ते राष्ट्राध्यक्षपदासाठी योग्य व्यक्ती नाहीत, असा आरोप त्यांनी यावेळी केला. दरम्यान, अमेरिकेच्या नागरिकांनी देशात स्थिरता आणण्यासाठी विचारपूर्वक मतदान करावं, असं आवाहनही मिशेल ओबामा यांनी केलं.

डेमोक्रेटिक पार्टीचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार जो बायडेन यांच्या बाजूनं प्रचार करताना मिशेल ओबामा यांनी २४ मिनिटांचा एक व्हिडीओदेखील शेअर केला. तसंच यात त्यांनी भावनात्मक आवाहनदेखील केलं. “सध्या देश अतिशय वाईट परिस्थितीत आहे. कोणत्या गोष्टी पणाला लागल्या आहेत याची मतदारांना कल्पना असायला हवी,” असंही त्या म्हणाल्या.

आणखी वाचा- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना ज्यांच्यापासून करोना झाला, त्या होप हिक्स कोण आहेत?

ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये

काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांना अमेरिकेतील वॉल्डर रीड मेडिकल सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. परंतु चार दिवस उपचार घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये दाखल झाले. ट्रम्प यांनी स्वत: ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार डोनाल़्ड ट्रम्प अद्यापही करोनामधून पूर्णपणे बाहेर आलेले नाहीत. परंतु त्यांच्या तब्येतीत काही सुधारणा झाल्यानंतर त्यांना व्हाईट हाऊसमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. ट्रम्प अद्यापही करोनातून पूर्णपणे बरे झाले नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. परंतु तब्येतीत काही सुधारणा दिसल्यानंतर त्यांना व्हाईट हाऊसमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली.

आणखी वाचा- … तर दुसरी प्रेसिडेन्शिअल डिबेट टाळायला हवी : जो बायडेन

प्रेसिडेन्शिअल डिबेटमध्ये सहभागी होणार

नुकताच ट्रम्प यांनी जो बायडेन यांच्यासोबत प्रेसिडेन्शिअल डिबेटमध्ये भाग घेतला होता. १६ ऑक्टोबर रोजी ट्रम्प आणि बायडेन यांच्यात मियामी येथे प्रेसिडेन्शिअल डिबेट होणार आहे. दरम्यान, बराक ओबामा आणि मिशेल ओबामा हे जो बायडेन यांच्यासाठी सतत प्रचार करत आहेत.