News Flash

AgustaWestland Scam : मिशेलची युपीएच्या बैठकांपर्यंत होती पोहोच!

काही प्रशासकीय अधिकाऱ्यांचा एक मोठा गट मिशेलला इत्यंभूत माहिती पुरवत होता. इतकेच नव्हे तर सुरक्षा व्यवस्थेसाठीची कॅबिनेट कमिटीच्या (सीसीएस) बैठकांची माहितीही त्याला मिळत होती.

संग्रहित छायाचित्र

ऑगस्टा वेस्टलॅंड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर व्यवहारातील दलाल ख्रिश्चिअन मिशेल याच्या एका पत्राने आश्चर्यकारक खुलासा केला आहे. या पत्रात मिशेलने दावा केला आहे की, त्याची पोहोच तत्कालीन युपीए सरकारच्या संवेदनशील बैठकांपर्यंत होती. मनमोहन सिंग यांच्या कॅबिनेटमधील काही मंत्री त्याच्या संपर्कात होते. त्याचबरोबर काही प्रशासकीय अधिकाऱ्यांचा एक मोठा गट मिशेलला इत्यंभूत माहिती पुरवत होता. इतकेच नव्हे तर सुरक्षा व्यवस्थेसाठीची कॅबिनेट कमिटीच्या (सीसीएस) बैठकांची माहितीही त्याला मिळत होती.

इकॉनॉमिक्स टाइम्सच्या वृत्तानुसार, २८ ऑगस्ट २००९ रोजी मिशेलने ऑगस्ट वेस्टलँडचे मालक जी. ओरसी यांना एक पत्र लिहीले होते. या पत्रामध्ये त्याने दावा केला होता की, त्याला अमेरिकेचे तत्कालीन सेक्रेटरीज ऑफ स्टेट हिलरी क्लिंटन आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यामध्ये झालेल्या गोपनीय चर्चेचा तपशील मिळत होता. मिशेलने आपल्या पत्रात या गोष्टीचाही पर्दाफाश केला होता की, तत्कालीन सरकारमधील अर्थमंत्री आणि संरक्षणमंत्री यांच्यामध्ये पावर-स्ट्रगल सुरु होता.

मिशेलने आपल्या पत्रात २००९ मध्ये १९ ते २३ जुलैदरम्यान हिलरी क्लिंटन आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यामध्ये झालेल्या बैठकींचा उल्लेख केला आहे. त्याने आपल्या पत्रात हिलरी क्लिंटन यांनी मनमोहन सिंग यांना काय म्हणाल्या याचा उल्लेख केला आहे. मिशेलने लिहीले होते की, मनमोहन सिंग काही अज्ञात कारणांमुळे अमेरिकेशी चांगले संबंध कायम ठेवण्याचे प्रयत्न करीत होते. या खरेदी प्रक्रियेतील मनमोहन सिंग यांच्या कार्यप्रणालीवरही त्याने टीका केली आहे. तर तत्कालीन संरक्षणमंत्र्यांना त्याने घमेंडी संबोधले आहे.

मिशेलने पत्रात लिहीले की, त्याच्या टीमला (यामध्ये काही प्रशासकीय अधिकारी आणि महत्वाच्या राजकीय व्यक्ती होत्या) हेलिकॉप्टर खरेदीसाठी हिरवा झेंडा मिळण्याची आशा होती. मात्र, पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सगळा खेळ बिघडवून टाकला होता. त्याने लिहिले की, पंतप्रधानांनी सर्व मंत्र्यांकडून या खरेदी प्रकरणासंदर्भात आवश्यक प्रश्न विचारण्यास सांगितले. त्यामुळे हे प्रकरण सीसीएसच्या बैठकीत गेले. आपल्या वरिष्ठासोबत मिशेल अर्थमंत्र्यांना भेटल्याचेही त्याने यात लिहीले आहे. आम्ही त्यांना कराराची माहिती न दिल्याबद्दल माफी मागितली आणि पंतप्रधानांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.

ऑगस्टा वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळा काय आहे?

युपीए-१च्या वेळेस अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी १२ हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा व्यवहार निश्चित झाला. त्यासाठी ऑगस्टा वेस्टलँड कंपनीसोबत ३६०० कोटी रुपयांचा व्यवहार अंतिम झाला. मात्र, या व्यवहारात १० टक्के लाच घेतल्याचा प्रकार समोर आला. युपीएच्या सरकारने २०१३मध्ये हा व्यवहार रद्द केला. दरम्यान, या प्रकरणात माजी हवाईदल प्रमुख एस. पी. त्यागी यांच्यासह १८ लोकांविरोधात खटला दाखल झाला. त्याचवेळी इटलीच्या मिलान स्थित कोर्टाने व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा उल्लेख केला. त्यानंतर कोर्टाने ऑगस्टा वेस्टलँडचा मालक जी. ओरसीला दोषी मानले आणि त्याला ४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या संपूर्ण खरेदी प्रकरणात मध्यस्थाचे काम ख्रिश्चिअन मिशेल करीत होता. मिशेलला नुकतेच दुबईतून प्रत्यार्पणाद्वारे भारतात आणण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2018 4:47 pm

Web Title: michelle reached out to upas meetings there was pressure on pm also in agusta westland scam
Next Stories
1 धक्कादायक ! बलात्कार पीडितेवर मदतीच्या नावाखाली अनोळखी लोकांनीही केला अत्याचार
2 पंजाबमध्ये राजीव गांधींच्या पुतळ्याला काळे फासले
3 अपंगाच्या तोंडात काठी घालण्याचा भाजपा नेत्याचा प्रयत्न, व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X