करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेवर आता आस्मानी संकट कोसळलं आहे. अमेरिकेच्या मध्य भागातील मिशिगन राज्यामध्ये होत असणाऱ्या जोरदार पावसामुळे राज्यातील दोन धरणे फुटली आहे. त्यामुळेच १० हजार लोकांना उंच ठिकाणी हलवण्यात आलं आहे. मिशिगनचे राज्यपाल ग्रेटचेन व्हाइटमर यांनी राज्यामध्ये आणीबाणीची घोषणा केली आहे. एडनविले आणि सॅनफोर्ड ही दोन धरणे बुधवारी फुटली असल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

पुढील काही तासांमध्ये मिशिगनमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून मीडलॅण्ड सखल भागांमध्ये नऊ फुटांपर्यंत पाणी साचण्याची भिती आहे, असं राज्यपालांनी बुधावारी रात्री बोलताना स्पष्ट केलं होतं. या भागामधील साडेतीन हजार घरांमध्ये राहणाऱ्या १० हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचे मीडलॅण्ड कंट्री बोर्ड कमीशनचे अध्यक्ष मार्क बोन यांनी सांगितलं आहे. सुदैवाने धरणफुटी आणि जोरदार पावसामुळे अद्याप कोणाचाही मृत्यू झालेला नाही असं सीएनएनने आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.

नॅशनल वेदर सर्व्हिस (एनडब्ल्यूएस) विभागाने दिलेल्या माहितीनुसार मिशिगनमधील मिडलँड भागातील टिट्टाबावासी नदी आणि स्टर्लिंगजवळील रायफल नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. या नद्यांना मोठा पूर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मंगळवारी टिट्टाबावासी नदीतील पाण्याची पातळी ३०.५ फूट इतकी होती. हीच पातळी बुधवारी ३८ फुटांपर्यंत वाढली. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे एडनविले आणि सॅनफोर्ड धरणे फुटली. एडनविले धरण १९२४ साली बांधण्यात आलं होतं तर सॅनफोर्ड १९२५ साली बांधण्यात आलं होतं.

करोनाच्या पार्श्वभूमीवर मिशिगनमध्ये मदतकार्य सुरु आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत बचावकार्य करण्यावर मर्यादा देणार आहेत. त्यामुळेच अमेरिकेमधील मिशिगन राज्य हे करोनाचे हॉटस्पॉट असल्याने मिडलँडमध्येही करोनाग्रस्तांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिडलँडमध्ये बुधवारपर्यंत (२० मे २०२०) ८० करोनाग्रस्त अढळून आले असून या भागामध्ये आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर मिशिगन राज्यामध्ये ५२ हजारहून अधिक करोनाग्रस्त रुग्ण अढळून आले असून पाच हजार जणांचा मृत्यू झाला आहे.