डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहिमला बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने २० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याच बाबा राम रहिमचे ट्विटर अकाऊंट, ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईटने बंद केले आहे. गुरमित राम रहिम या नावाने जर ट्विटरवर सर्च केले तर हे अकाऊंट बंद करण्यात आल्याची सूचना ट्विटरकडून मिळते.भारतात राम रहिमचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले आहे असा संदेशही समोर येतो.

राम रहिम हा ट्विटरवर अॅक्टिव्ह होता, या अकाऊंटवर त्याचे अनेक फॉलोअर्स आहेत. मात्र आता गुरमित राम रहिम असे ट्विटरवर सर्च केले असता, ‘@Gurmeetramrahim‘s account has been withheld in: India.’ असा संदेश दाखविण्यात येतो.

बऱ्याचदा ट्विटर सुरक्षेचा उपाय म्हणून कोणतेही अकाऊंट एखाद्या देशापुरते बंद करू शकते, गुरमित राम रहिमचे ट्विटर अकाऊंट भारतापुरतेच बंद करण्यात आले आहे. हे अकाऊंट गुरमित राम रहिम याने स्वतः बंद केले आहे की सरकारी यंत्रणांनी ते बंद केले आहे याबाबत माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

एवढेच नाही तर आता यापुढे बाबा राम रहिम सिनेमा किंवा टीव्ही मालिकेत काम करू शकणार नाही. ‘एएनआय’ने दिलेल्या बातमीनुसार फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनने बाबा राम रहिमचा सिनेमा आणि मालिकांमध्ये काम करण्याचा परवाना रद्द केला आहे. राम रहिमने आत्तापर्यंत ४ ते ५ सिनेमांमध्ये काम केले आहे आणि त्या सिनेमांना चांगले यशही मिळाले आहे. यापुढे मात्र राम रहिम कोणत्याही सिनेमात काम करू शकणार नाही.

१५ वर्षांपूर्वी २ साध्वींचे लैंगिक शोषण आणि बलात्कार केल्याप्रकरणी बाबा राम रहिमला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २५ ऑगस्ट २०१७ ला बाबा राम रहिमला दोषी ठरविण्यात आले आणि त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजेच २८ ऑगस्ट २०१७ बाबा राम रहिमला शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुरमित राम रहिमला न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर पंचकुला आणि सिरसा मध्ये मोठा हिंसाचार उसळला होता, ज्यामध्ये ३८ जणांचा मृत्यू झाला आणि २५० पेक्षा जास्त लोक जखमी झाले.