बँक्वेट हॉलच्या बांधकामाला मंजुरी मिळावी, यासाठी दिल्ली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना ३० लाख रुपयांची लाच दिल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले मायक्रोमॅक्स मोबाईल कंपनीचे मालक राजेश अग्रवाल यांच्यासह सात जणांना गुरुवारी सात दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली. दिल्लीतील न्यायालयाने सात जणांना १४ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
राजेश अग्रवाल, मनीष तुली, सतीश कुमार, नरेश कुमार, संजय कुमार, राजेश गुप्ता आणि अशोक लांबा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
दिल्लीतील वझीरपूर या भागात मायक्रोमॅक्स कंपनीला बँक्वेट हॉल उभारायचा आहे. यासाठी राजेश आणि मनीष दिल्ली पालिकेच्या संबंधित विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. या कामाला मंजुरी मिळावी यासाठी राजेश व मनीष यांनी ३० लाख रुपये लाच देण्याचे कबूल केले होते. याचा सुगावा सीबीआयला लागला. बुधवारी त्यानुसार सापळा रचला असता राजेश, मनीष यांच्यासह दिल्ली पालिकेच्या चार कर्मचाऱ्यांनाही अटक करण्यात आली होती.