संगणक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आणि ऑपरेटिंग सिस्टिमची प्रणेती ‘मायक्रोसॉफ्ट’ने विंडोज एक्स्पीला मंगळवार, ८ एप्रिलपासून सपोर्ट देणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याची पूर्वकल्पना देण्यात आली होती. त्यामुळे  या ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित कंपन्यांनी पर्यायी व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे. मात्र एक्स्पीचा वापर अद्याप पूर्णपणे थांबलेला नाही. याचबरोबर घराघरांमध्ये ज्यांच्याकडे जुने डेस्कटॉप आहेत अशांकडेही एक्स्पी हीच ऑपरेटिंग सिस्टिम आहे. मायक्रोसॉफ्टने हा निर्णय का घेतला आहे, याचा संगणक वापरावर काय परिणाम होणार आहे, याबाबत जाणून घेऊया.

 एक्स्पीला  सपोर्ट  थांबविणार म्हणजे काय?
१२ वष्रे संगणकांवर काम करणाऱ्या एक्स्पी या ऑपरेटिंग सिस्टिमला ८ एप्रिलपासून कोणताही सपोर्ट न देण्याचा निर्णय मायक्रोसॉफ्टने घेतला आहे. म्हणजे या ऑपरेटिंग सिस्टिमला मायक्रोसॉफ्टकडून कोणतीही सुरक्षा मिळणार नाही याचबरोबर ती वापरणाऱ्यांना तांत्रिक सपोर्ट दिला जाणार नाही. यामुळे एक्स्पी वापरणाऱ्या यंत्रणांवर सायबर हल्ले करणे सहज सोपे होणार आहे. मायक्रोसॉफ्टने गेल्या १२ वर्षांत एक्स्पीनंतर अनेक ऑपरेटिंग सिस्टिम बाजारात आणल्या. सध्या मायाक्रोसॉफ्टची विंडोज ८.१ ही ताजी ऑपरेटिंग सिस्टिम आहे. याचा वापर वाढवा. जेणेकरून संगणक आणि मोबाइल आपल्याला एकमेकांशी थेट जोडून काम करण्याचा कंपनीचा मानस आहे.
सपोर्ट थांबविल्यावर काय होणार
कंपनीच्या या निर्णयामुळे आपला संगणक बंद होईल, असे अजिबात नाही. मात्र नव्याने येणारी सॉफ्टवेअर, ब्राऊझर्स तसेच विविध टूल्स आपल्याला वापरता येणार नाहीत. इतकेच नव्हे तर सुरक्षेची हमीही कंपनी देणार नाही. ऑपरेटिंग सिस्टिममध्ये कोणत्याही प्रकारचे सायबर हल्ले होऊ नयेत म्हणून कंपनीने ऑपरेटिंग सिस्टिम तयार करताना काही तांत्रिक तरतुदी केलेल्या असतात. कालांतराने येत जाणारे व्हायरस रोखण्यासाठीही कंपनीतर्फे वेळोवेळी ग्राहकांना अपडेट्स दिले जातात. यासर्व गोष्टी यापुढे एक्स्पीच्या बाबतीत मायक्रोसॉफ्ट करणार नाही. यामुळे ज्यांच्याकडे एक्स्पी आहे त्यांना आता आपली ऑपरेटिंग सिस्टिम अपग्रेड करावी लागणार आहे. एक्स्पीच्या सपोर्टबरोबरच मायक्रोसॉफ्टने ऑफिस २००३लाही सपोर्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
एक्स्पीमधून मायग्रंट कसे होणार
मोठय़ा कंपन्यांसाठी मायक्रोसॉफ्टने थेट विंडोज ८.१चा पर्याय समोर ठेवला आहे. या कंपन्यांना अत्याधुनिक सुविधा पुरविणारी आधुनिक ऑपरेटिेंग सिस्टिम अधिक चांगल्याप्रकारे वापरता यावी यासाठी मायक्रोसॉफ्टने वर्षभरापूर्वीच बाजारात आणलेल्या विंडोज ८च्या पुढे जाऊन विंडोज ८.१ बाजारात आणली आहे. यामध्ये एक्स्पीचे काही सॉफ्टवेअर वापरता येण्याची सुविधा देण्यात आली आहे. यासाठी कंपनीने विशेष कक्ष तयार केला असून मायक्रोसॉफ्ट सपोर्टटीममध्ये हा कक्ष कार्यरत आहे. याशिवाय मायक्रोसॉफ्टचे अधिकृत भागीदारही सॉफ्टवेअर अपग्रेडेशनसाठी कंपन्यांना मदत करणार आहेत. याचबरोबर तुमच्या संगणकांचे हार्डवेअर सुधारित ऑपरेटिंग सिस्टिमला पूरक (कॉम्पॅटिबल) आहे की नाही तसेच ते तसे होण्यासाठी काय पर्याय असतील हेही या सपोर्ट कक्षातर्फे सांगण्यात येणार आहे. मध्यम आणि लघु उद्योजकांसाठी मायक्रोसॉफ्टने विंडोज ७ आणि विंडोज ८.१चा पर्याय दिला आहे. ज्यांच्या घरी विंडोज एक्स्पी आहे त्यांना हीच ऑपरेटिंग सिस्टिम कायम वापरता येऊ शकणार आहे. याचबरोबर जर तुमच्या संगणकाचे हार्डवेअर विंडोज ८.१ला सपोर्ट करू शकणारे असतील तर तुम्ही तुमच्या संगणकावर विंडोज ८.१ अपग्रेड करू शकता. यासाठी तुम्ही मायक्रोसॉफ्टच्या वेबसाइटवर जाऊन ‘विंडोज अपग्रेड असिस्टंट.ईएक्सई’ ही फाइल डाऊनलोड करून त्यानंतर ती सिस्टिममध्ये रन करा. यामध्ये तुम्हाला तुमच्या संगणकाची अपडेटेड ऑपरेटिंग सिस्टिमसाठी आवश्यक अशी क्षमता आहे की नाही हे समजू शकेल. जर तुमच्या संगणकाची नवीन  सिस्टीम वापरण्याची क्षमता नसेल तर तुम्हाला स्वस्त आणि मस्त नव्या संगणकांचे पर्यायही मायक्रोसॉफ्ट सुचविले जाते.
एक्स्पी वापरणे सुरक्षित आहे का?
सपोर्ट थांबविल्यावरही एक्स्पी वापरणे सुरक्षित आहे का, असा प्रश्न अनेकांना पडत आहे. तर वापरावर काही परीणाम होणार नसला तरी आज नाही तर भविष्यात तुम्हाला अपग्रेड होणे क्रमप्राप्त राहील. कारण नव्याने येणारी सॉफ्टवेअर्स, विविध टूल्स तुम्हाला वापरता येणार नाहीत. यामुळे तुमच्या संगणक वापरावर मर्यादा येऊ शकतात. याचबरोबर या ऑपरेटिंग सिस्टिमवर सुरक्षा योजना फारशा कार्यन्वित नसल्यामुळे सायबर गुन्हेगारांना हल्ला करणे सोपे जाणार आहे. यामुळे तुमचा संगणक तुम्ही इंटरनेटला जोडला की त्या माध्यमातून येणारे व्हायरस जलदगतीने तुमच्या संगणकात पसरतात आणि संगणक बिघडवण्यास सुरुवात करतात. हे व्हायरस तुम्हाला अँटिव्हायरसच्या मदतीने कमी करता येऊ शकतील. मात्र ऑपरेटिंग सिस्टिम सक्षम नसल्यामुळे व्हायरसेस येण्याचा वेगही वाढत राहील.
    
* मायक्रोसॉफ्टने एक्स्पीच्या मालवेअर सपोर्ट प्रणालीची मर्यादा १४ जुलै २०१५पर्यंत एक्स्पी संगणकांमध्ये कार्यरत असणार आहे. याचा अर्थ असा नाही की ही ऑपरेटिंग सिस्टिम सुरक्षित राहील.
*  मंगळवारनंतरही एक्स्पी ऑपरेटिंग सिस्टिम संगणकावर चालणार. संगणक बंद होणार नाहीत.
* विंडोज ७मध्ये देण्यात आलेले एक्स्पी मोडलाही सपोर्ट मिळणार नाही.
*  सध्या एक्स्पीसाठी देण्यात येणारे अपडेट्स यापुढेही येणार नाहीत. कारण एक्स्पी सपोर्ट नोटिफिकेशन बंद करण्यात येणार आहे.